कोकणक्राइमसिंधुदुर्ग

ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन फरार असलेल्या संशयित आरोपी सचिन ओटवणेकरला तात्काळ अटक करा

 

*सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुजीत जाधव आणि जिल्हा सरचिटणीस श्री. चंद्रसेन पाताडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना दिले निवेदन…*

*संशयित आरोपी सचिन ओटवणेकरला अटक करण्यास पोलीसांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर राज्यभरातील चर्मकार बांधवांचा मोर्चा काढण्याचा दिला ईशारा…*

*ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह*

*ओरोस, दि.२ :* मे. ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे संचालक श्री. सचिन शिवराम ओटवणेकर यांनी श्री. अरविंद महादेव गायकवाड यांना दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी अश्लील शिवीगाळ व मारहाण केली होती. त्या प्रकऱणानंतर सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्याविरोधात अनुसुचित जाती वा अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r), भादंवि कलम २९४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका चर्मकार समाजातील व्यक्तीला अश्लील शिवीगाळ व मारहाण करून गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सात दिवस उलटले तरीसुद्धा संशयित आरोपीला अटक झालेली नाही. त्यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुजीत जाधव आणि जिल्हा सरचिटणीस श्री. चंद्रसेन पाताडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे यांना निवेदन दिले आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी श्री. सचिन ओटवणेकर यांनी अटकेच्या भितीने पळ काढला आहे आणि ते फरार झाले आहेत. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. तरीसुद्धा फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ का करीत आहे…? असा खडा सवाल श्री. सुजीत जाधव व श्री. चंद्रसेन पाताडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना विचारला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, एकंदरीतच या संपुर्ण प्रकरणात पोलीसांची व डीवायएसपी सावंतवाडी यांची भुमिका संशयास्पद व बिल्डरधर्जिणी राहिली आहे. वर नमुद प्रकरणी आमचे चर्मकार बांधव श्री. अरविंद गायकवाड यांनी दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी ओरोस पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यादिवशी त्यांना संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत सहा तास ओरोस पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. ते सरकारी नोकरीत असल्याने एका बिल्डरविरोधात तक्रार देणे त्यांना किती महागात पडू शकते याबाबत पोलीसांनी त्यांना भिती दाखवली. श्री.ओटवणेकर यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वत्र वायरल करून बिल्डरची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात आयटी ऍक्टनुसार बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी सुद्धा पोलीसांकडून देण्यात आली. मात्र सहा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवल्यानंतर एफआयआर दाखल करणे दुरच राहिले पोलीसांनी साधी एनसी देखील दाखल करून घेतली नाही. दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक ओरोस यांनी संध्याकाळी संबंधित बिल्डरला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि तक्रारदाराला बिल्डरसोबत तडजोड करण्याची ऑफर दिली. त्यानंतरही तक्रारदार बिल्डरसोबत तडजोड करण्यास तयार होत नसल्याने पोलीसांनी स्वतःच टाईप केलेल्या जबाबावर तक्रारदाराची जबरदस्ती सही घेतली. त्या जबाबाच्या आधारावर एनसी दाखल करून घेतली परंतु बिल्डरवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणुन ओरोस पोलीस स्टेशन व डीवायएसपी सावंतवाडी यांनी पुरेपुर प्रयत्न केलेत. शेवटी तक्रारदारांची पत्नी असलेल्या सौ. शारदा अरविंद गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे पोलीसांनी नाईलाजास्तव २६ जानेवारी दिवशी आरोपी विरोधात ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी सचिन ओटवणेकर गुन्हा दाखल होताच फरार होऊन लपुन बसला आहे. आज गुन्हा दाखल होऊन सात दिवस उलटले आणि जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असुन देखील आरोपीला अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. डीवायएसपी सावंतवाडी यांच्याशी आरोपीचे असलेले लागेबांधे विचारात घेता पोलीस प्रशासन त्याला जाणीवपूर्वक अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे एखादा आरोपी चर्मकार बांधवाला माराहाण करून गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलीसांच्या क्रुपाशीर्वादाने मोकाट फिरत असेल तर एकंदरीतच समाजात एक चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. भविष्यात अटकेची भीतीच राहिली नाही तर कुणीही सवर्ण समाजातील व्यक्ती ऊठसूठ दलित समाजातील व्यक्तीला मारहाण करायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यासाठीच फरार संशयित आरोपी श्री. ओटवणेकर याला तात्काळ अटक करणे सामाजिकद्रुष्टीने तितकेच महत्वाचे आहे. तरी वर नमूद प्रकरणी पुढील ४८ तासात आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला अटक करण्यात यावी. ऍट्रॉसिटी केसमधील संशयित आरोपी असलेल्या श्री. ओटवणेकर याला अटक करण्यास पोलीसांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यास त्याचा निषेध करण्यासाठी संवैधानिक पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर राज्यभरातील चर्मकार बांधवांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराच सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. सुजीत जाधव आणि जिल्हा सरचिटणीस श्री. चंद्रसेन पाताडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!