कोकण

पर्यटन स्थळावरून माघारी येताना सिद्धेश गोसावी युवकाचा अपघातात मृत्यू

आंबोलीतील वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या कुडाळ तालुक्यातील एका युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. कावळेसाद पर्यटन स्थळावरून माघारी येत असताना दुचाकी घसरून दुसऱ्या गाडीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. सिद्धेश सुहास गोसावी (२८, रा. सांगिडेवाडी ता. कुडाळ) असे त्याचे नाव असून त्याचा सहकारी अक्षय प्रकाश म्हाडगूत ( २४, रा. आंबेरी माणगाव तालुका कुडाळ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याबाबतची माहिती आंबोली दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांनी दिली आहे.सिद्धेश गोसावी व त्याचा सहकारी मित्र अक्षय म्हाडगूत हे दोघे शनिवारी कुडाळ येथून आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी गेले होते. आंबोलीतील कावळेसाद पॉईंट वरून माघारी येत असताना १०० मीटर अंतरावर त्यांची दुचाकी घसरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीवर धडकली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने सिद्धेश याचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी अक्षय म्हाडगूत हा गंभीर जखमी झाला.

 

या अपघाताची माहिती मिळताच आंबोली दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व त्यांचे सहकारी मनीष शिंदे व दीपक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक पर्यटकांच्या मदतीने या दोघांनाही आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. मात्र तत्पूर्वीच सिद्धेश चा मृत्यू झाला होता. तर अक्षय हा देखील गंभीर जखमी असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताबाबत चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!