शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे काळाची गरज-अमोल बुचडे
आम्ही वैभववाडीकर आयोजित शिवकालीन प्रशिक्षण शिबिर
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडीत शिवकालीन कलेचे जतन व्हावे आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे काळाची गरज आहे, असे मत शिवशाहू मर्दानी आखाडा कोल्हापूरचे प्रशिक्षक अमोल बुचडे यांनी केले. वैभववाडी दत्त मंदिर येथे “आम्ही वैभववाडीकर” आयोजित शिवकालीन खेळ प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सादरीकरणाच्या यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वैभववाडी येथील उद्योजक विकास काटे, मंगेश कदम, संतोष टक्के, महेश रावराणे, विद्याधर सावंत, नंदू रावराणे, गंगाधर केळकर, बंडू सावंत ,सचिन रावराणे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते
यावेळी अमोल बुचडे म्हणाले की, शिवकालीन गड-किल्ले हे शिवरायांच्या आठवणी आहेत. त्या आठवणींना दरवर्षी उजाळा दिला जातो. शिवशाहू मर्दानी आखाडा कोल्हापूरच्या वतीने शिवप्रताप दिन आणि स्वराजाभिषेक दिन किल्ल्यावर जाऊन साजरे केले जातात. तरुण-तरुणींनी दुर्गभ्रमंती मोहीम करावी, मर्दानी खेळ महिलांनीही अवगत करणे करणे गरजेचे आहे. महिलांनीही अशा खेळाचे ज्ञान आत्मसात करून आपले स्वसंरक्षण करावे.
वैभववाडी आणि करूळ येथे हे प्रशिक्षण १ जानेवारी ते १० जानेवारी असे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भैया कदम यांनी करूळ येथील ३० विद्यार्थी आणि वैभववाडीतील ३० विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन प्रशिक्षण कलेचे आयोजन केले होते. यामध्ये तलवारबाजी, भालाफेक, काठी फेक, लिंबू मारणे आणि युद्धकलेचे इतर सर्व प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. सहायक प्रशिक्षक प्रथमेश चव्हाण, श्रेयश बावले, अभिषेक पाटील, साक्षी माजगावकर, युक्ता माने यांनी १० दिवस मुलांना प्रशिक्षण दिले. वैभववाडी शहरातील लोकांनी हे “शिवकालीन खेळ” प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गर्दी केली होती.

