मडूरा येथे एसटी सुरु न केल्यास उपोषण सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना निवेदन
प्रतिनिधी – अंकुश नाईक
बांदा – मडूरा पंचक्रोशीसाठी असणार्या सर्व एसटी येत्या चार दिवसात सुरु न केल्यास सावंतवाडी बसस्टँडमध्ये विद्यार्थ्यांसमवेत उपोषण करण्याचा इशारा भाजपचे मडूरा विभागीय उपाध्यक्ष यशवंत माधव यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे. तशा आशयाचे लेखी निवेदन सावंतवाडी आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे यांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, मडूरा पंचक्रोशीसाठी असणार्या सातोसे – सावंतवाडी या तीनही बससेवा बंद आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. वाहनांची सुविधा नसल्याने अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी वाहने घेऊन जाताना दिसतात. यावेळी अपघात घडल्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल यशवंत माधव यांनी आगार व्यवस्थापक शेवाळे यांना केला.
एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व ग्रामस्थांना शहराकडे जाण्यासाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. येत्या चार दिवसात एसटी सुरु न केल्यास सावंतवाडी बसस्टँडमध्ये विद्यार्थी व ग्रामस्थांसमवेत उपोषण करण्याचा इशारा माधव यांनी दिला. तसे लेखी निवेदनही त्यांनी सादर केले.