वसंत मोरेंच्या निर्णयाने वंचीत आघाडी पक्षात जळफळाट*
*वसंत मोरेंच्या निर्णयाने वंचीत आघाडी पक्षात जळफळाट*
पुणे-
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांनी मनसेला राम राम करत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीतून वसंत मोरे यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र म्हणावी अशी मते वसंत मोरे यांना पडली नाही. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी आपली वेगळी वाट धरली आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत.
*वसंत मोरेंचा निर्णय पचनी पडला नाही*
वसंत मोरे यांनी गुरूवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते उद्धव ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. वसंत मोरे यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही.अशातच आता पुणे शहरातील कात्रज येथील कार्यकर्ते जनसंपर्क कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे गटाची वाट धरल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप केला आहे.
*वसंत मोरे ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात?*
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे हे त्यांच्या हडपसर आणि खडकवासला दोन्हींकडून लढू शकतात. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं. माझा तो भाग नव्हता तरीही मला चांगली मते मिळाली आहे. माझ्यावर पहिला गुन्हा हा शिवसेनेत असताना झाला होता, असं वसंत मोरे म्हणाले होते.
मी बदलणार नाही. जनतेसाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करणार असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत. शिवसेनेची शहरात आणि बाहेर देखील चांगली ताकद असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत. तसेच 10 नगरसेवक आहेत त्यांची बाहेर देखील ताकद असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत.

