कासार्डेत कामगाराचा मृतदेह आढळला
कासार्डेत कामगाराचा मृतदेह आढळला
कणकवली
कणकवली चार दिवसांपासून कासार्डे येथील राहत्या झोपडीतून बेपत्ता असलेले गैसुद्दीन वकील अहमद (४५, मूळ उत्तरप्रदेश, सध्या रा. कासार्डे दाबवाडी) हे शनिवारी सायंकाळच्या सुमारास कासार्डे – बौद्धवाडी येथील जंगलमय भागातील पायवाटेवर मृतावस्थेत आढळले. गैसुद्दीन यांना दारुचे व्यसन होते व त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे खबरीत म्हटले आहे.
गैसुद्दीन हे उत्तरप्रदेश येथील सहकारी कामगारांसमवेत कासार्डे येथे सिलिका माईन्स येथे कार्यरत होते. हे सर्व कामगार कासार्डे येथे झोपड्यांमध्ये राहतात. मंगळवार १४ मे रोजी गैसुद्दीन कामावर गेले नव्हते. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास ते राहत्या झोपडीतून बेपत्ता झाले होते. सहकारी कामगारांनी त्यांचा शोध घेतला. तसेच उत्तरप्रदेश येथील गावाकडेही चौकशी केली. मात्र, गैसुद्दीन आढळून आले नव्हते.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी कासार्डे बौद्धवाडी येथील जंगलमय भागातील पायवाटेवर एक मृतदेह आढळून आला. कासार्डे पोलीस पाटील देवरुखकर व गैसुद्दीन यांच्या सहकारी कामगारांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेह गैसुद्दीन यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
गैसुद्दीन यांचे सहकरी कामगार रामटेहल बेचू तनोजिया (३६, सध्या रा. कासार्डे – दाबवाडी व मूळ रा. उत्तरप्रदेश) यांच्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

