सावंतवाडी बाजारपेठे मध्ये दाखल झाला केरळचा नीलम आंबा..
यंदा दाखल झालेल्या केरळच्या नीलम आंब्याची चव लोकांना माफक दरात चाखायला मिळत आहे.
प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर
सावंतवाडी बाजारपेठेत यावर्षी पहिल्यांदाच एवढ्या लवकर केरळचा नीलम आंबा दाखल झाला आहे. दरवर्षी हा आंबा एप्रिल किंवा मे मध्ये बाजार पेठेत दाखल होतो मात्र या वर्षी लवकर दाखल झाला आहे.
दरवर्षी डिसेंबरला हापुस आंबा मुंबईच्या बाजारात जातो. येथील स्थानिक लोकांना हा आंबा किंमत अधिक असल्याने खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्याना हा आंबा त्यांच्या बजेटमध्ये खरेदी करण्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागते. तर आवाक्यात असलेल्या मानकुर पायरी, रायवळ या आंब्यांची चव चाखण्यासाठी एप्रिल अखेर आणि मे महिन्याची वाट पाहावी लागते. मात्र, यंदा दाखल झालेल्या केरळच्या नीलम आंब्याची चव लोकांना माफक दरात चाखायला मिळत आहे. या आंब्याचा दर प्रतिकिलो २६० रुपये आहे. दर दिवसाला दहा ते बारा किलो आंबे येथे विक्री होत आहेत. हे आंबे कच्चे असतात. ते घरी नेऊन पिकवता येतात. मानकुरसारखे दिसणारे हे आंबे चवीला गोड असल्याचे विक्रेते सांगतात.

