चांद्रयान ३’, गणरंग स्पर्धेचे आज बक्षीस वितरण
चांद्रयान ३’, गणरंग स्पर्धेचे आज बक्षीस वितरण
कुडाळ येथे कार्यक्रम : लोकमान्य सोसायटी, ‘तरुण भारत संवाद’चे आयोजन
सावंतवाडी
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी आणि ‘तरुण भारत संवाद’ यांच्यावतीने आयोजित ‘चांद्रयान ३’ विषयावरील विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण गुरुवार ९ नोव्हेंबरला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हॉटेल लाईम लाईट सभागृह, कुडाळ येथे होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून स्पेस इंजिनिअर निखिल खानोलकर यांची उपस्थिती असणार आहे. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आणि ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला. ‘तरुण भारत संवाद’चे सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, लोकमान्यचे संचालक पंढरी परब, लोकमान्यचे रिजनल मॅनेजर बाळासाहेब पांडव आदी मान्यवर उपस्थित राहणारआहेत.
‘चांद्रयान ३’ विषयावरील चित्रकला, निबंध आणि काव्य या तिन्ही स्पर्धांना स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तिन्ही गटात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे परीक्षण तज्ज्ञ • परीक्षकांकरवी केल्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. चित्रकला स्पर्धेत तिन्ही गटात प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार तर उत्तेजनार्थ पाच क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये, निबंध स्पर्धेतील तिन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना
प्रत्येकी पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपये तर उत्तेजनार्थ दहा क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये, काव्य स्पर्धेतील तिन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार तर उत्तेजनार्थ दहा क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.
गणरंग स्पर्धेचेही बक्षीस वितरण
लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित ‘लोकमान्य गणरंग २०२३’ चित्रकला स्पर्धेचे स्पर्धेचे बक्षीस वितरणही याचवेळी होणार आहे. या स्पर्धा पहिली ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. यावेळी दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी आणि ‘तरुण भारत संवाद’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

