साकवावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
साकवावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
नेमळे
शेतात चारा काढण्यासाठी साकवावरून जात असताना तोल जाऊन ओहोळात पडल्याने नेमळे एरंडवाघवाडी येथील गुंडू सीताराम कासकर (५६) हे शेतकरी गंभीर झाले. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नेमळे- एरंडवाघवाडी येथे घडली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुंडू कासकर हे दररोजच्याप्रमाणे गुरांना आपल्या घरालगत असलेल्या शेतजमिनीत चारा आणण्यासाठी – गेले. शेतात जाताना ओहोळावर
साकव आहे. या साकवावरून पायी चालत जाताना त्यांचा अचानक तोल जाऊन ते ओहोळात असलेल्या दगडावर पडून बेशुद्ध पडले. उशीर झाला तरी ते घरी आले नाही म्हणून तेथील शेजाऱ्यांनी त्याचा शोध घेत असता ते ओहळात बेशुद्धावस्थेत आढळून आले. तात्काळ त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. डॉक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचे घोषित केले. रुग्णालयात पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार गलोले, पोलीस हवालदार अनिल धुरी यांनी पंचनामा केला.
