दिव्यांग संस्थेने मानले तहसीलदारांचे आभार
दिव्यांग संस्थेने मानले तहसीलदारांचे आभार
कणकवली
गेले अनेक दिवस दिव्यांगांच्या समस्या वाढत असल्याने एकता दिव्यांग विकास संस्थेच्या माध्यमातून तहसीलदार यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते. तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी काही दिवसांत आपण बैठक घेऊन शक्य तेवढ्या शासनस्तरावरील समस्यांचे निरसन करू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कार्यवाही केल्याने एकता दिव्यांग विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची भेट घेत आभार मानले.
तहसीलदार देशपांडे यांनी दिलेल्या आश्वासनांनुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय घेऊन समस्यांचे निरसन केले. त्यानंतर दिव्यांगांची
दोन ते तीन महिने रखडलेली पेंशन लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर उपलब्ध करण्यासाठी देशपांडे यांनी पाठपुरावा केला होता. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीर घेण्यात आले होते. शिबिराचा साधारणपणे शंभरहून अधिक दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेतला. यावेळी संस्थाध्यक्ष सुनील सावंत म्हणाले, तहसीलदार देशपांडे यांच्यासारखा अधिकारी आम्हाला मिळणे हे आमचं भाग्य समजतो. दिव्यांगांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवणारा अधिकारी आम्ही आजवर पाहिलाही नाही. यावेळी देशपांडे यांनी दिव्यांगांच्या समस्या मार्गी लावल्या जातील, असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय वारंगे, सचिव सचिन सादये, बाळकृष्ण बावकर, यल्लपा कट्टीमणी, राणे, बापू जाधव, मंदा काणेकर उपस्थित होते..
