शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर लॉंगमार्च
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर लॉंगमार्च
सावंतवाडी
२० पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण पुढे करत राज्यातील १५ हजाराहून अधिक शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर ‘आजरा ते सावंतवाडी’ लॉंगमार्च निघणार आहे. २८ ऑक्टोबरपासून आजऱ्याहून निघणारा हा लाँगमार्च ३० रोजी सावंतवाडीत येणार आहे. या शिक्षण हक्क यात्रेत हजारो लोक सहभागी होणार असल्याची माहिती या आंदोलनाचे प्रमुख कॉम्रेड संपत देसाई यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या या धोरणामुळे वाडी-वस्तीवरील हजारो शाळा बंद होणार आहेत. याचा पहिला फटका मुलींना बसणार आहे. समूह शाळेच्या नावाखाली खासगीकरणाच्या दिशेने सरकार वाटचाल करत आहे. शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण सर्वांना मोफत उपलब्ध होईल, असे वाटत होते. पण त्याच कायद्याचा गैरवापर करत राज्य सरकार बहुजन समाजातील कष्टकरी वर्गातील मुलांच्या शिक्षणाचा गळा घोटू पाहतंय. मुळातच इथे शिकण्याला बंदी होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या संघर्षातून आता कुठे पहिली पिढी शिकत आहे. त्यांच्या शिक्षणाची वाट कायमची बंद करणारे हे धोरण आहे. या विरोधात हे आंदोलन आम्ही सुरू
केले आहे. जोपर्यंत २० पटसंख्येखालील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील सुजाण नागरिक, पालक, शिक्षक यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही शाळा बचाव आंदोलनाच्यावतीने करत आहोत.
राज्य सरकारच्या या धोरणाचा सर्वाधिक फटका हा शिक्षणमंत्री केसरकर यांच्याच मतदारसंघातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. या मतदारसंघातील सर्वाधिक शाळा बंद होणार आहेत. हा लॉंग मार्च आजरा येथून पायी सावंतवाडीपर्यंत येणार असून एक हजारहून अधिक लोक या आंदोलनात सहभागी होतील, असेही सांगण्यात आले.

