मडगावातील गोळीबार प्रकरणी किंग मोमोला जामीन मंजूर
मडगावातील गोळीबार प्रकरणी किंग मोमोला जामीन मंजूर
मडगाव
मडगावच्या जूना बाजार येथे पैशांच्या वादातून गोळीबार केल्याप्रकरणी किंग मोमो रसल डिसोझा याला ३० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला. तथापि, त्याला १५ दिवस पोलिस स्टेशनमध्ये दररोज हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कोर्टाने त्याला त्यांचा पासपोर्ट फातोर्डा पोलिस ठाण्यात जमा करण्याचेही आदेश दिले आहेत. याशिवाय हजेरीव्यतिरिक्त मडगाव परिसरात १५ दिवस न येण्याबाबतही त्याला न्यायालयाने फर्मावले आहे. मडगाव येथील जुन्या मार्केटमधील ए-वन खान फास्टफुड सेंटरचे मालक मशीमुल्ला उर्फ लालू खान यांच्यावर रसेलने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने खान यातून बचावले.
गतवर्षीच्या कार्निव्हल परेडमध्ये रसेल याची ‘किंग मोमो’ म्हणून निवड झाली होती. डिसोझा हा मडगावातील व्यावसायिक असून पूर्वी तो फास्टफुड सेंटर चालवायचा. नंतर ते सेंटर त्याने लालू खान यांना चालवायला दिले. या दुकानाच्या भाडेपट्टी कराराची मुदत संपल्याने ते बंद केले होते. २ लाख रुपये डिपॉझिट परत करण्यासाठी खान यांनी डिसोझाला फोन केला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये शिवीगाळही झाली.
या वेळी भडकलेल्या डिसोझाने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. लालू खान पळून गेल्याने बचावले. त्यानंतर डिसोझा स्वतःहून फातोर्डा पोलिस ठाण्यात पोलिसांना शरण आला. याप्रकरणी डिसोझाला पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास डिसोझाने गोळीबार केला होता.