कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

नुकसानभरपाईसाठीचा दावा सुनावणीआधीच रद्द

नुकसानभरपाईसाठीचा दावा सुनावणीआधीच रद्द

कणकवली

एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत दाखल केलेल्या फिर्यादीवरून चाललेल्या खटल्यात आरोपीची संशयाचा फायदा देत मुक्तता केली होती. यात मुक्ततेनंतर आरोपीने फिर्यादीसह खटल्यातील निवडक साक्षीदारांविरूद्ध द्वेषमूलभावनेने फौजदारी कारवाई केल्याने १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याचा केलेला दावा सहदिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर ओरोसचे न्यायाधीश एस. डी. चव्हाण यांनी सुनावणीअगोदरच रद्द केला. साक्षीदारांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले..
पोस्कोअंतर्गत खटल्यातील आरोपी विनोद शिवाजी चौगुले याची पोस्को विशेष न्यायालयाने संशयाचा फायदा देत मुक्तता केली होती. परंतु, न्यायालयाने अल्पवयीन फिर्यादीने दिलेली फिर्याद व दाखल खटला खोटा असल्याचे निष्कर्ष काढलेले नव्हते. मात्र, निर्णयानंतर आरोपीने आपल्याविरूद्ध फिर्यादी व साक्षीदारांनी संगनमत करून कट रचून द्वेषमूलभावनेने खोटा खटला दाखल केला, असे नमूद करून समाजात झालेल्या अब्रुनुकसानीबाबत ७ लाख आणि शारीरिक मानसिक त्रासाबाबत २ लाख व खटल्याच्या खर्चाबाबत १ लाख अशी १० लाखांची भरपाई मागितली होती. याकामी साक्षीदारांच्यावतीने सदरचा खटला हा कायदेशीर तरतुदींच्या विरुद्ध असून पीडितेची ओळख उघड करणारा असल्याने, शिवाय त्याला कोणतेही कारण घडलेले नसल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. खटल्याच्या सुनावणीआधीच साक्षीदार, प्रतिवादींची मागणी मान्य करून न्यायालयाने सदरचा खटला रद्द केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!