तुळसुली विद्यालयात २२ लाखाचा अपहार
तुळसुली विद्यालयात २२ लाखाचा अपहार
कनिष्ठ लिपिकाविरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल
कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील तुळसुली ऐक्यवर्धक संघ संचलित लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बँक खात्यातील रकमेच्या खोट्या पावत्या बनवून त्या लेखापरीक्षण अहवालात खऱ्या असल्याचे भासविले आणि रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवून एकूण २१ लाख ८६ हजार ९७२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी या विद्यालयाचे कनिष्ठ लिपीक मुकुंद आत्माराम वारंग (४०, रा. वारंगाची तुळसुली) याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद स्कूल कमिटी चेअरमन कृष्णा केशव वारंग (रा. वारंगाची तुळसुली कालेलकरवाडी) यांनीकुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, हा गुन्हा २९ ऑगस्ट २०१७ ते २४ ऑ क्टोबर २०१९ या कालावधीत घडला आहे. तुळसुली ऐक्यवर्धक संघ संचलित मान्यताप्राप्त, अनुदानप्राप्त खासगी माध्यमिक लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (तुळसुली) या शैक्षणिक संस्थेत कनिष्ठ लिपीक या पदावर मुकुंद आत्माराम वारंग कार्यरत आहे. त्याने संस्थेच्या बचत खात्यातील एकूण ५ लाख ६९ हजार ६६८ रुपये स्वतःच्या बँक खात्यात बेकायदेशीर व अनधिकृतरित्या वळविले. तसेच संस्थेच्या बचत खात्यातून मुकुंदने ६ लाख ४४ हजार २६६ रुपये रक्कम धनादेशावर खोट्या स्वाक्षरी करून रोख स्वरुपात काढली आणि ती स्वत:च्याआर्थिक फायद्यासाठी वापरली तसेच तुळसुली ऐक्यवर्धक संघ, मुंबई- तुळसुली या नावाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुळसुली शाखेत खोट्या व बनावट मुदत बंद ठेवीच्या ९ लाख ७३ हजार २० एवढ्या रकमेच्या सात खोट्या पावत्या बनवून त्या लेखापरीक्षण अहवालात खऱ्या असल्याचे भासविले. ही रक्कमसुद्धा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता वापरली. त्याने संस्थेच्या २१ लाख ८६ हजार ९७२ एवढ्या रकमेचा अपहार करून फिर्यादी व संस्थेची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुकुंदवर गुन्हा दाखल केला. कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी सूर्यवंशी तपास करीत आहेत.

