गणेशोत्सव काळात उपचार, निदान पथके तैनात करणार
गणेशोत्सव काळात उपचार, निदान पथके तैनात करणार
ओरोस
गणेशोत्सवासाठी मुंबई परिसरातून आणि परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानके, रेल्वेस्टेशन व चेकपोस्टवर १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत उपचार व निदान पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
१९ रोजी गणेशोत्सव असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आरोग्य विभागाकडून विविध सेवा देण्यात येणार आहेत. यासाठी आरोग्य विभागामार्फत रेल्वेस्टेशन व बसस्टॅण्ड, तसेच चेकपोस्ट या ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून ती १५ ते १८ सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत. रेल्वे स्टेशनवरील पथके रेल्वे वेळापत्रकानुसार तैनात असतील. एस. टी. स्टॅण्डवरील पथके सकाळी ते दु. २ व दु. २ ते रात्री ८ अशा दोन सत्रात १५ सप्टेंबर पासून
कार्यान्वित राहतील. प्रत्येक पथकात किमान दोन आरोग्य कर्मचारी राहणार असून डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसीस व कोविड-१९ या आजाराबाबतचे आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. या पथकाकडे क्लोरोक्वीन, पॅरासिटेमॉल डॉक्झीसायक्लीन, अॅन्टी डायरियल गोळ्या तसेच रक्त नमुना व स्वॅब घेण्यासाठीची कीट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. रेल्वे स्टेशन किंवा एस. टी. स्थानकावर आलेल्या प्रवाशापैकी ज्यांना ताप, अंगदुखी, डोकेदुखी अतिसार व फ्ल्यू अशाप्रकारची लक्षणे असल्यास त्यांनी या पथकांकडून औषधोपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पथकामध्ये हिवताप, डेंग्यू चिकुनगुन्या, काविळ, लेप्टोस्पायरोसीस अशाप्रकाच्या लक्षणांच्या रुग्णांना “उपचार दिल्यानंतर रुग्णाचा सध्याचा तात्पुरता व कायमचा पत्ता यांची नोंद करण्यात येणार आहे. जेणेकरून या रुग्णांचा पाठपुरावा करणे सुलभ होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

