केसरकर यांचे मंत्रिपद राहते की नाही याबाबत शंकाच!
केसरकर यांचे मंत्रिपद राहते की नाही याबाबत शंकाच!
सावंतवाडी
गतवर्षी खलनायक ठरविलेल्या अजित पवार यांच्या स्वागतासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कसे धावत होते, हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. केसरकर यांची लाचारी यातून दिसत आहे. राज्यात सध्याच्या घडामोडी पाहता केसरकर यांचे मंत्रिपद राहते की नाही, अशी शंका आता निर्माण झाली आहे, असा टोला उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केसरकर यांना लगावला आहे.
डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे की, गतवर्षी ठाकरे सरकारमधून बंड करून बाहेर पडल्यानंतर सध्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी अजित पवार यांच्यावर टीका करत होते. यात केसरकर यांचाही समावेश होता. निधी देत नाहीत म्हणून अजित पवार यांना या सर्व मंडळींनी खलनायक ठरवले होते. तेच अजित पवार आता शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी केसरकर त्यांच्यामागे धावत असल्याचे चित्र राज्याने पाहिले आहे. यातून केसरकर यांची लाचारी दिसून येते. केसरकर यांचे मंत्रिपद टिकते की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. सध्या जनतेच्या प्रश्नांचे देणेघेणे या राजकारण्यांना नाही, असा टोलाही डॉ. परुळेकर यांनी हाणला आहे.

