सावंतवाडी पोलीस ठाण्यात महिला अधिकारी नियुक्त करा!
सावंतवाडी पोलीस ठाण्यात महिला अधिकारी नियुक्त करा!
सावंतवाडी
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांविषयक होणारे गुन्हे हाताळण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, अशी मागणी होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरमकुमार अग्रवाल यांनी सदरच्या रिक्त जागेवर महिला पोलीस अधिकारी नियुक्ती करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. यापूर्वी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी म्हणून स्वाती यादव यांनी यशस्वीपणे महिलांविषयक गुन्हे हाताळून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. छेडछाड, विनयभंग, अत्याचार, कौटुंबिक वाद असे अनेक गुन्हे यादव यांनी हाताळले होते. त्यांच्या सेवेनंतर त्यांची प्रशासकीय बदली झाल्याने सदर पद रिक्त आहे. रिक्तपदामुळे महिलांविषयक गुन्हे पोलीस अधिकाऱ्यांना हाताळावे लागतात. पर्याय म्हणून दुसऱ्या पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांना पाचारण करण्याची वेळ येते. महिला अधिकारी यांच्याकडून अशा गुन्ह्यांचा तपास व चौकशी होते, त्यावेळी पीडित फिर्यादी न डगमगता सत्य समोर मांडते. त्यामुळे अशा गुन्ह्याचा तपास होऊन पोलीस संशयितापर्यंत पोहोचून गजाआड होतो. त्यामुळे पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती होणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस अधीक्षक/ अग्रवाल यांनी लक्ष घालून महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
