त्या’ आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी
त्या’ आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी
सिंधुदुर्गनगरी
कुडाळमधील ‘त्या’ आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये अलीकडेच मुंबई येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सदरची महिला मुंबईहून कुडाळच्या त्या हॉटेलमध्ये नेमक्या कोणत्या कारणासाठी आली होती? तिच्या शेजारच्या रुममध्ये असणाऱ्या त्या दोघा युवकांचा तिच्याशी नेमका कोणता संबंध होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत असून संपूर्ण प्रकरण संशयास्पद वळणावर असल्याचे नमूद करत “आत्महत्या की घातपात’ यापेक्षा प्रकरणाशी संबंधित रॅकेटचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा, याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. आजच्या घडीस कुडाळ पोलीस ‘आत्महत्या की घातपात’ याविषयी चौकशी करीत आहेत. परंतु सदरची महिला मुंबईहून कुडाळमध्ये इव्हेंटच्या नावाखाली दाखल होणे व शेजारील रुममधील ‘त्या’ ‘दोघांचा वावर यामागचं नेमकं कनेक्शन शोधून पोलिसांनी प्रकरणाच्या मुळापाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे. या मागे नेमके कोण आहे? घटनेनंतर संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज करप्ट झाले की केले गेले? यामुळे संशय अधिक बळावला असून त्याचा पारदर्शी तपास होण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर व तपासावर अवघ्या जिल्ह्याचें लक्ष लागून आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कुडाळ पोलिसांच्या तपासावर मनसेकडून ‘एकप्रकारे शंका उपस्थित करण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
