कोकण रेल्वेचा वेग आजपासून मंदावणार
कोकण रेल्वेचा वेग आजपासून मंदावणार
कणकवली
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा वेग शनिवार १० जूनपासून थोडासा मंदावणार आहे. कारण प्रतिवर्षाप्रमाणे कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक १० जूनपासून लागू होणार आहे.
कोकण रेल्वेतर्फे वर्षामध्ये दोन टण्यांमध्ये रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. हे वेळापत्रक ‘मान्सुन’ आणि ‘नॉनमान्सुन’ अशा दोन स्वरुपात असते. अन्य भागांच्या तुलनेत कोकणात पावसाचे प्रमाण खूपच मोठे आहे. त्यात सोसाट्याचा वारा आणि धुकेही असते. बऱ्याचदा पावसामुळे ट्रॅक खराब होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याच करणास्तव पावसाळा कालावधीत कोकण रेल्वेतर्फे वेगळे वेळापत्रक बनवले जाते.
अर्थातच ‘मान्सून’च्या कालावधीत प्रवासी रेल्वेगाड्यांचा वेग काहीसा कमी होतो. साहजिकच प्रत्येक स्थानकावरील गाडी पोहोचण्याची व सुटण्याची वेळ बदलते. विशेषतः मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या यापूर्वीच्या वेळेच्याआधी स्थानकावर येणार असून अंतिम स्थानकात मात्र वेळेत पोहोचणार आहेत. तर मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत विशेष कोणताही बदल झालेला नाही. त्यानुसारच आता १० जूनपासून कोकण रेल्वेतर्फे ‘मान्सून’ वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवाशांनीही याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

