स्वामी विवेकानंद यांचे स्मारक वेंगुर्ल्यात होण्यासाठी निधी मिळावा!
स्वामी विवेकानंद यांचे स्मारक वेंगुर्ल्यात होण्यासाठी निधी मिळावा!
वेंगुर्ले
शिकागो येथील सर्वधर्म परिषदेला जाण्यापूर्वी स्वामी विवेकानंद हे गोव्यातून वेंगुर्ल्यात आले होते. याचे उल्लेख पुस्तकात सापडतात. अशा महान व्यक्तीचा पदस्पर्श वेंगुर्ले शहरात झालेला आहे. त्यामुळे या भूमीला पर्यटनदृष्ट्या वलय निर्माण करण्यासाठी वेंगुर्ले नगरात त्यांचे स्मारक उभारले जावे. ते झाल्यास पर्यटन व ऐतिहासिक गोष्टीमुळे वेंगुर्लेच्या नावाची उंची वाढेल, असा त्याचा दुहेरी फायदा होईल. त्यादृष्टीने न. प. हद्दीत त्यांचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आनंदयात्री वाङमय मंडळातील लेखिका वृंदा कांबळी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे…
निवेदनात म्हटले की, सद्यस्थितीत वेंगुर्ले नगर परिषद ही स्वच्छता उपक्रमात अग्रेसर असून जिल्हा राज्य, कोकण व देश पातळीवरील
पुरस्कारांनी सन्मान शासनातर्फे झाला आहे. वेंगुर्ले शहराच्या सौंदर्यीकरणाचे उपक्रमही राबवून सुबक, स्वच्छ सुंदर शहर बनविले जात आहे. काही विकासकामे ही पर्यटन विकास वृद्धिंगत करणारी ठरत आहेत. त्यामुळे पर्यटक जास्त प्रमाणात वेंगुर्ल्याकडे येत आहेत. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेस महान तपस्वी स्वामी विवेकानंद हे गोव्यातून वेंगुर्ल्यात येऊन गेल्याच्या नोंदी काही पुस्तकांत सापडत असल्याने ती ऐतिहासिक गोष्ट वेंगुर्ल्यासाठी निश्चितच भूषणावह आहे. या स्मारकासाठी नगरपरिषदेकडून जागा उपलब्ध व्हावी व त्यासाठी येणारा खर्च शासनाच्या निधीतून व्हावा. यासाठी आपण सहकार्य करावे, अशी मागणी कांबळी यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कवियित्री प्रीतम ओगले, वृंदा गवळकर, प्रार्थना हळदणकर, प्रसन्ना देसाई, प्रा. सचिन परूळकर आदी उपस्थित होते..

