मध्यरात्रीनंतर बिअर न दिल्याने मारहाण
मध्यरात्रीनंतर बिअर न दिल्याने मारहाण
नांदगाव येथील घटना : दोघांविरोधात गुन्हा
कणकवली
मध्यरात्री बिअर न दिल्याच्या रागातून महेश साळवी (४४, रा. नांदगाव-ओटवफाटा, भवानी कॉम्प्लेक्स) यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी केदार खोत व नीलेश उर्फ गोट्या कोरगावकर (दोघे रा. नांदगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीची घटना मंगळवारी उत्तररात्री २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
केदार खोत व नीलेश कोरगावकर या दोघांनी मंगळवारी रात्री १२.३० वा. सुमारास एका मुलाला नांदगाव येथील बिअर शॉपमधून बिअर आणण्यास पाठविले. तो मुलगा बिअर शॉपजवळ आला असता त्याने महेश साळवी यांना केदारखोत याने बिअर मागतील ती द्या, असे सांगितले. मात्र, आता रात्र झाली असून बिअर शॉप बंद झाला, असे सांगून त्या मुलाला साळवी यांनी परत पाठवले. २.१५ वाजण्याच्या सुमारास केदार व नीलेश यांनी महेश साळवी यांच्या घरी जावून घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर महेश बाहेर आले असता त्यांना दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
*गुन्हा दाखल*
याप्रकरणी महेश साळवी यांनी या दोघांविरोधात कणकवली पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार केदार व नीलेश यांच्याविरोधात भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस चंद्रकांत झोरे करीत आहेत.

