बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी कारवाई
बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी कारवाई
कुडाळ
कुडगाव- नेरूरपार येथे कर्ली नदीपात्रात बेकायदा वाळू उत्खनन करताना एक होडी सापडली असून कुडाळ तहसीलदारांच्या आदेशाने होडी व मालकावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल चेंदवण तलाठी यांनी सादर केला आहे.६ फेब्रुवारी रोजी कुडाळ तहसीलदार यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार गाव मौजे कुडगाव येथील नेरूरपार येथील कर्ली नदीपात्रानजीक सर्व्हे क्र. ५७/१० मध्ये सायंकाळी साडेपाच वाजता प्रत्यक्ष पाहणी केली असता,वाळूने भरलेली होडी दिसून आली. ही मिळकत रघुनाथ बाळकृष्ण परब यांच्या नावे दाखल असून या होडीमधील गौण खनिज व होडी मालक याबाबत परप्रांतीय मजुरांकडे चौकशी केली असता, ही होडी योगेश श्याम नाईक यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. तसेच या होडीमधील सुमारे दोन ब्रास वाळूसाठ्याबाबत कोणताही परवाना नसल्याने सदरचे गौण खनिज (वाळू) अवैध असल्याने त्याबाबत जप्तीनामा करून होडीमधील दोन ब्रास वाळूसह. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड पतन विभाग (मालवण) यांच्यासमक्ष होडीमालक योगेश श्याम नाईक यांच्या ताब्यात सुपूर्दनामा करून देण्यात आली. होडीमधील असणारी वाळू अवैध असल्याने जप्तीनामा व सुपुर्दनामा तयार केला आहे. होडीमालक यांचा जबाब घेऊन याप्रकरणी वस्तुस्थितीबाबत चेंदवण तलाठी यांनी पंचयादी तयार करून दंडात्मक कार्यवाहीकरिता तहसीलदारांकडे अहवाल पाठविण्यात आला.

