कुडाळात सुसाट कारची लोखंडी फलकाला धडक
कुडाळात सुसाट कारची लोखंडी फलकाला धडक
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांनाच अरेरावी? : मुंबई-गोवा मार्गाच्या सर्व्हिस रोडवरील घटना
कुडाळ
मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून सुसाट वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दिशादर्शक लोखंडी फलकाला धडक दिली. यात कारचे मोठे नुकसान झाले. हा अपघात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास येथील हॉटेल आरएसएन समोर घडला. पिंगुळी येथून हॉटेल लेमनग्रास ते आरएसएनकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवरून ही कार सुसाट वेगाने येत फलकावर धडकली. सुदैवाने त्यावेळी समोर कोणी पादचारी किंवा वाहन नसल्याने अनर्थ टळला. कारमधील काहीजण नशेत होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कारमध्ये चित्रीकरणासाठी आलेली माणसे होती. अपघातानंतर तेथे आलेल्या एका प्रतिष्ठिताने अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना अरेरावीची भाषा केली, अशी चर्चा मंगळवारी दिवसभर शहरात सुरू होती. तशी पोस्टही सोशल मीडियावर फिरत होती. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात नव्हती. मात्र, घडलेला प्रकार पोलिसांना रात्रीच समजला होता.

