येत्या २६ नोव्हेंबर चा देशव्यापी संप व रस्ता रोको आंदोलने जोरदार यशस्वी करा..
▪️भाजपच्या मोदी सरकारची शेतकरी व कामगार विरोधी धोरणे हाणून पाडा..
▪️भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्ग
🎴सिंधुदुर्ग,दि.१७: कोरोना केसेस आणि मृत्यू या दोन्हीमध्ये अमेरिकेनंतर भारत आज जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, माझं सरकार २१ दिवसात कोरोना नष्ट करणार. पण झालं काय? २४ मार्चला देशातील कोरोना बाधितांची संख्या फक्त ५२४ होती आणि मृत्यू फक्त १० होते. १३ नोव्हेंबरला देशातील कोरोना बाधितांची संख्या ८७ लाख ३० हजार झाली आहे आणि मृत्यू १ लाख २९ हजार झाले आहेत. ही संख्या रोज वाढतच आहे. याला कारण भाजप सरकारनं औषधे महाग केली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था डबघाईला आणली. खासगी हॉस्पिटलांना लूटमार करायला परवानगी दिली. कोरोना संपला नाही. लोक रोज मरत आहेत. पण मोदी तिकडे मोराला दाणे भरवत आहेत!
जनतेची दाणादाण: लॉकडाऊन केला, पण कोरोना गेला नाही. गेल्या लोकांच्या नोकऱ्या. १५ कोटी लोक आज बेरोजगार झाले आहेत. ते काम करायला तयार आहेत. पण त्यांना काम दिले जात नाही. ६० कोटी लोकांची उपासमार होत आहे. उपासमारीत भारत जगातल्या १०७ देशात ९४व्या नंबरवर भाजप सरकारने नेऊन ठेवला आहे. डिझेल-पेट्रोल ८० ते ९० रुपये, कांदा १०० रुपये आणि शेंगदाणा तेल ३०० रुपयांवर गेलं आहे. धान्य महाग, भाजीपाला महाग, औषध महाग. स्वस्त आहे, फक्त मरण. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वजा २४ टक्क्यांनी घटले आहे. जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशाची इतकी घसरण झालेली नाही. मोदी सरकारच्या जनविरोधी आणि धनिकधार्जिण्या धोरणांमुळे कोरोनापूर्वीच अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. आता ती कडेलोटापर्यंत गेली आहे.
अंबानी-अदानी मालामाल: भाजप सरकारचे लाडके अंबानी-अदानी आणि त्यांच्या भांडवलदार भाईबंदांना लॉकडाऊन नाही. बड्या व्यापाऱ्यांची आणि जमीनदार-सावकारांची पण चंगळ आहे. मुकेश अंबानी यांचं नशीब झोपत नाही. २४ तास मीटर चालू. ते एका तासाला ९० कोटी रुपये कमावतात. २४ तासात २,१६० कोटी. असे ते कोरोना काळातच जगातले पाच नंबरची सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भाजपला अंबानी-अदानी आणि त्यांचे भाईबंद निवडणुकीसाठी भरमसाठ पैसा पुरवतात. टी. व्ही. चॅनेलवरून मोदींचा, भाजपचा, रा. स्व. संघाचा प्रचार करतात. म्हणूनच भाजप अर्णब गोस्वामीच्या पाठीशी आपली सर्व ताकद उभी करतो.
भाजपला देशाचं संविधान नको, मनुस्मृती पाहिजे: बाबासाहेबांनी जाळलेल्या मनुस्मृतीची भाजपभक्त पूजा करतात. मनुवादी म्हणतात, स्त्रिया घाण असतात; दलित आदिवासी गलिच्छ असतात; मुसलमान परकीय असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो, हे सगळे गुलाम असले पाहिजेत. म्हणून हाथरससारख्या दलित मुलीवर सामुहिक बलात्कार आणि तिच्या खुनाच्या भयानक घटना होतात. मोदी सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालते. अर्णब गोस्वामीला लगेच जामीन मिळतो. पण भीमा-कोरगावच्या प्रकरणात खोट्या केसमध्ये ८० वर्षांच्या वयोवृद्धांना मोदी सरकार जामीन मिळू देत नाही. दिल्लीची दंगल भाजपवाल्यांनी पेटवली. पण त्यासाठी मुसलमान पोरापोरींना, विरोधी पक्षातल्या लोकांना मोदी सरकार जेलमध्ये घालत आहे. त्यासाठीच अमित शहांना गृहमंत्री नेमलं आहे. फडणविसांनी अर्णब गोस्वामीची फाईल बंद केली होती. ती ठाकरे सरकारनं खोलली. आता न्यायमूर्ती लोयांच्या संशयास्पद मृत्यूची फाईल पुन्हा खोलायला पाहिजे. ‘फोडा आणि झोडा’ या ब्रिटिश सरकारच्या जुन्या नीतीला अनुसरून, भाजप आणि रा. स्व. संघाच्या केंद्र सरकारने धर्मांधता, मनुस्मृती आणि हुकूमशाही व्यवहाराला चालना दिली आहे. देशाच्या संविधानावरच त्याने आघात सुरू केले आहेत. केवळ दलित, आदिवासी, महिला, मुस्लिमच नव्हे तर हिंदूंमधीलसुद्धा बहुसंख्य जनतेच्या जीवनावर हे सरकार असंख्य हल्ले करत आहे.
शेतकऱ्यांचा विश्वासघात: शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो आणि स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणून मोदी २०१४ साली सत्तेवर आले. आता त्यांनी शेतकऱ्यांच्याच विरोधात तीन कायदे केले आहेत. शेतीमाल बड्या कंपन्या व व्यापाऱ्यांच्या, साठेबाजांच्या व काळाबाजारवाल्यांच्या ताब्यात देणारे कायदे केले. गरीब शेतकरी कंपन्यांच्या दावणीला बांधणारा कायदा केला. या कायद्याने सरकार आता शेतकऱ्याला शेतातून उठवणार, आपलेच शेत गिळणाऱ्या कंपनीचा चपराशी करणार. अवकाळी पावसासोबत सरकारपण शेतकऱ्याला झोडपू लागलं आहे. पुरेशी नुकसानभरपाई देत नाही. सगळी पिके वाहून गेली. पण सरकारला शेतकऱ्याची दयामाया येत नाही. शेतमालाला किफायतशीर भाव देत नाही, कारण भांडवलदार व व्यापारी डोळे वटारतात. कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जमाफी भाजप सरकार करत नाही. पण नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या अशा देश सोडून पळालेल्या कर्जबुडव्या भांडवलदारांचे ६८,००० कोटी रुपयांचे कर्ज हे सरकार कोरोना काळात एका झटक्यात माफ करून टाकते.
शेतमजुरांवर संक्रांत: मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मोडीत काढत आहे. मनरेगाची कामं काढत नाही. रेशनला धान्य येत नाही. मजुरी वाढवत नाही. किमान वेतनाचे दर वाढवत नाही. घरांसाठी प्लॉट देत नाही. पंतप्रधान घरकुल योजनेतून लाखोंना वगळले जाते. सगळ्या जमिनी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा सर्रास उद्योग सुरू आहे.
कामगाराचं घरदार उध्वस्त: बड्या भांडवलदारांनी भाजपला निवडणुकीसाठी पैसे दिले. त्यांच्या सांगण्यावरून भाजप सरकारने कामगारांविरुद्ध चार कायदे करून त्यांचे हक्क काढून घेतले. कामगारांना संघटना करता येणार नाही. संप करता येणार नाही. त्यांना नोकरीचे संरक्षण काढून घेतले आहे. मालकांना कामगारांचे जास्त शोषण करण्यास सरकारने सर्रास परवानगी दिली आहे.
आदिवासींना जीवनातून उठवायचं कारस्थान: आदिवासींनी जोपासलेलं जंगल मोदी सरकार त्याच्या भांडवलदार दोस्तांच्या घशात घालत आहे. वनाधिकार कायदा राबवत नाही. आदिवासींना वनजमिनीचा हक्क देत नाही. देवस्थान, इनाम, गायरान, वरकस जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करत नाही. उलट बुलेट ट्रेन व इतर प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे.
वीज दरवाढीचा जबर शॉक: शेतकरी-कामगार विरोधी कायदे पास केल्यानंतर आता भाजप सरकार नवीन वीज कायदा करणार आहे. सगळ्यांना विजेचा दर सारखा करणार. शेतकरी-शेतमजुराला-कामगाराला जो वीज दर तोच अंबानी-अदानी यांना. विजेची सबसिडी हा गरिबांचा हक्क आहे. विजेची बिले आजही भरमसाठ प्रमाणात येत आहेत. ती भरणे अशक्य होत आहे. आता विजेचा दर इतका वाढवणार की झटका बसून आपले डोळे पांढरे होणार. घरदार अंधारात बुडणार. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायला पोरापोरींना केरोसीनही रेशनमधून मिळणार नाही. त्यातच नवीन शैक्षणिक धोरण आणून मोदी म्हणताहेत, शिकायचं तर भरमसाठ फी भरायला तयार व्हा. आता आरक्षणही बंद करणार.
देशच विकायला काढला: ‘आत्मनिर्भरते’च्या फसव्या घोषणेखाली देशाचे सार्वजनिक क्षेत्र- रेल्वे, बँका, विमा, टेलिकॉम, शिक्षण, आरोग्यसेवा, वीज, पाणी, तेल, खाणी आणि संरक्षण उत्पादन- म्हणजे संपूर्ण देशच भाजप सरकारने देशीविदेशी भांडवलदारांना विकायला काढला आहे.
आपले ज्वलंत स्थानिक प्रश्न: आपल्या अनेक स्थानिक मागण्याही या आंदोलनात धसास लावायच्या आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या प्रचंड अवकाळी पावसामुळे आपल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने खावटी अनुदान जाहीर केले असले तरी त्यासाठी टाकलेल्या जाचक अटींमुळे ते बहुतेक आदिवासी जनतेला मिळणारच नाही. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी अत्यंत असमाधानकारक रीतीने होत आहे आणि बहुसंख्य आदिवासी जनतेला वन जमिनीवर हक्क अजूनही मिळालेला नाही. ज्या काहींना मिळाला त्यांनाही खूप कमी जमीन मिळाली आहे. देवस्थान, इनाम आणि वरकस जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे केल्या जात नाहीत.
याउलट बुलेट ट्रेन, अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन अशा प्रकल्पांमुळे लाखो शेतकरी, शेतमजूर, कामगार, मच्छिमार व सामान्य जनतेच्या जमिनी, गावे आणि जीवनच उद्ध्वस्त करायला भाजपचे केंद्र सरकार निघाले आहे.
मोदी देशबुडवे पंतप्रधान निघाले. भाजप देशबुडवा पक्ष निघाला. रा. स्व. संघ डोळे मिटून दलित, आदिवासी, मागास हिंदू-मुसलमान आणि महिलांची बगळ्यासारखी शिकार करणारी फॅसिस्ट संघटना निघाली.
म्हणून गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२० ला सर्व शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, कामगारांनी, महिलांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी काम बंद करून, गाव बंद करून रस्त्यावर उतरायचं! चक्का जाम करायचा! असं नाक दाबायचं की मोदी सरकारचं तोंड उघडलंच पाहिजे! मोदींचे जिगरी दोस्त डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन जनतेने नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत पराभव केला आहे! बिहारमध्ये तिथल्या जनतेनं मोदींचे नाक दाबत आणलंच होतं, गडबड घोटाळा करून भाजप कसाबसा वाचला. आता जबरदस्त एकी करू या! धर्म-जातीचे भेद मिटवू या! देशाला रा. स्व. संघ आणि भाजपच्या सैतानी राजवटीपासून वाचवू या! २६ नोव्हेंबरचा संप आणि रस्ता रोको आंदोलन प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक करू या! हजारोंच्या संख्येने लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली प्रचंड जोमाने आणि निर्धाराने सामील होऊ या!
२६ नोव्हेंबर २०२० रोजी चे काम बंद, गाव बंद, रस्ता बंद कशासाठी?
१. केंद्र सरकारचे शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे आणि वीज विधेयक रद्द करा.
२. प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिने दरमहा ७,५०० रु. केंद्र सरकारमार्फत द्या.
३. प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिने दरडोई १० किलो धान्य केंद्र सरकारमार्फत मोफत द्या.
४. कोरोना रोगराईतून सुटका व्हावी म्हणून सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सर्वत्र बळकट करा.
५. वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. सर्व दावे मंजूर करून चार हेक्टरपर्यंतची वनजमीन कसणाऱ्याच्या नावे करून ७/१२ कसणाऱ्याच्या नावे कब्जेदार सदरी करा.
६. देवस्थान इनाम, गायरान, वरकस व महसूल जमीन कसणाऱ्याच्या नावे करा. पीक पाहणी करून प्रत्यक्ष कसणाऱ्याची नोंद करा.
७. अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व फॉरेस्ट प्लॉट धारकांना एकरी ५०,००० रुपये नुकसान भरपाई द्या.
८. पीक विमा योजना सर्वंकष करून तिचा फायदा विमा कंपन्यांना नव्हे, तर शेतकऱ्यांना द्या.
९. प्रत्येक आदिवासी कुटुंबाचे सर्वेक्षण करून सर्वांना सरसकट खावटी तगाई द्या.
१०. प्रत्येक कुटुंबाला मनरेगा जॉबकार्ड द्या व प्रत्येक ग्राम पंचायतीत मागेल त्याला गावापासून ५ कि.मी.च्या आत रोजगार हमीचे काम आणि रास्त व नियमित वेतन द्या.
११. जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी व कारखान्यांतील रोजगारात स्थानिक तरुण-तरुणींना रोजगारात ८० टक्के प्राधान्य द्या.
१२. कोरोना काळातील सर्व वीज बिले माफ करा व भरमसाठ वीज बिले आकारणे बंद करा. गरज असेल तेथे नवीन विद्युत कनेक्शन त्वरित द्या.
१३. दारिद्रयरेषेखालील प्रत्येक कुटुंबाला केशरी कार्ड न देता पिवळे रेशन कार्ड द्या. रेशन कार्ड विभक्त करून नवीन रेशन कार्ड द्या. रेशन कार्ड नसलेल्यांना नवीन रेशन कार्ड द्या.
१४. पंतप्रधान घरकुल योजनेत ‘ड’ यादीमध्ये ज्यांची नावे टाकण्यात आली नाहीत त्यांची पुरवणी यादीत नावे घ्या. शबरी आवास योजना गरजू लाभार्थीना द्या.
१५. बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, नदी जोड, अभयारण्य, इको सेन्सिटिव्ह झोन हे प्रस्तावित जनविरोधी प्रकल्प रद्द करा. विविध प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा सरसकट विनाअट मोबदला कसणाऱ्या शेतकऱ्यांना द्या.
१६. पेसा निधीचा प्रत्येक ग्रामपंचायततीमध्ये योग्य पद्धतीने वापर करा व विकास कामे पूर्ण करा. प्रत्येक खेड्यापाड्यात रस्त्याची, पाण्याची आणि विजेची व्यवस्था करा.
१७. आँनलाईन शिक्षण पद्धती बंद करा. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तत्काळ सुरू करा व शाळा सुरू करून शैक्षणिक साहित्य द्या.
१८. रोजगार, शिक्षण आणि आरोग्याचा संविधानाच्या मूलभूत हक्कात समावेश करा.
१९. महिला, दलित, आदिवासी यांवर अत्याचार करणाऱ्यांवर ताबडतोब कठोर कारवाई करा.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU)
अखिल भारतीय किसान सभा (AIKS)
अखिल भारतीय शेतमजूर युनियन (AIAWU)
अ.भा. जनवादी महिला संघटना (AIDWA)
भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI)
स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)
*_💥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..💥_*
*🔥SALE!!!🔥SALE!!!🔥SALE!!!🔥*
*_🪔दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ब्रँडेड कपडे खरेदी करा आणि मिळवा ५०% ची सूट_💰*
_🏃🏻♂️👖👕वाट कसली बघताय? आज भेट द्या सयानी ड्रेसेस ह्या कपड्याच्या दालनाला! आणि मिळवा आपल्या आवडत्या कपड्यांवर ५०% ची सूट_💰🏃🏻♀️
*🏩आमचा पत्ता*
*सयानी ड्रेसेस*
उभाबाजार, चितारआळी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
*_📱संपर्क : 9423818666_*
*🔮ऑफर काही मर्यादित दिवसांसाठीच..*
*🔮अटी व शर्ती लागू..*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

