बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून
पुणे
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व (फेब्रुवारी-मार्च) लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे.
राज्य मंडळाने यापूर्वी लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके अधिकृत संकेतस्थळावर १९ सप्टेंबर २०२२ पासून उपलब्ध करून दिली होती. या वेळापत्रकाबाबत मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या.त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून दहावी व बारावीची वेळापत्रके अंतिम करण्यात आली आहेत. ही अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये तसेच प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली

