Uncategorized

सावंतवाडीत ‘सिंधूशक्ती युवती संमेलन’ उत्साहात संपन्न!

महिला शिक्षण, आरोग्य आणि नारीशक्ती @ २०४७ वर विचारमंथन; मर्दानी खेळ आणि ‘मिशन साहसी’ची प्रात्यक्षिके

सावंतवाडी, दि. १६ ऑक्टोबर : युवतींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत त्यांच्यात आत्मविश्वास, साहस आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ‘सिंधूशक्ती’ युवती संमेलन सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात उत्साहात संपन्न झाले. महिला शिक्षण, आरोग्य, करिअरच्या संधी आणि ‘नारीशक्ती @ २०४७’ या विषयांवरील परिसंवादांसह मर्दानी खेळ व ‘मिशन साहसी’च्या प्रात्यक्षिकांनी संमेलनाला विशेष रंगत आणली.

संमेलनाच्या प्रारंभी कार्यक्रम प्रमुख प्रणिता परब यांनी अभाविपची भूमिका आणि संमेलनामागील उद्देशाची मांडणी करत प्रास्ताविक केले, तसेच ॲड. श्रीशा कुलकर्णी यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयाची मांडणी करत समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाची भूमिका आणि योगदान यांचे महत्त्व विशद केले.

या संमेलनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांत सहमंत्री आशी गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी संवाद साधण्याची संधी या माध्यमातून युवतींना मिळाली.

संमेलनातील पहिल्या परिसंवादात उपजिल्हाधिकारी सौ. आरती देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. नेहा मुरकुटे आणि सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले सहभागी झाल्या. प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक तयारी, करिअर निवडीतील आव्हाने, कामाचा अनुभव आणि यशस्वी प्रवास याविषयी त्यांनी युवतींना मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवांतून युवतींना विविध करिअर संधींची माहिती मिळण्यासोबतच स्वतःचे ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळाली.

दुसऱ्या परिसंवादात डॉ. रश्मी कार्लेकर, डॉ. गौरी गणपत्ये आणि डॉ. मेधा फणसळकर यांनी सहभाग घेतला. महिला शिक्षण, आरोग्य आणि समाजातील महिलांची भूमिका यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सक्षम महिला घडवण्यासाठी शिक्षणासोबतच आरोग्याविषयी जागरूकता आणि आत्मनिर्भरता महत्त्वाची असल्याचा संदेश या परिसंवादातून देण्यात आला. ‘नारीशक्ती @ २०४७’ या संकल्पनेतून विकसित भारताच्या निर्मितीमध्ये महिलांची भूमिका आणि योगदान याविषयीही विचारमंथन करण्यात आले.

युवतींमध्ये धाडस आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी मर्दानी खेळांचे सादरीकरण तसेच ‘मिशन साहसी’ अंतर्गत साहसी प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रात्यक्षिकांमधून संकटांचा आत्मविश्वासाने सामना करण्याची तयारी, धैर्य आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

विचार, प्रेरणा, मार्गदर्शन आणि साहसाची अनुभूती देणारे ‘सिंधूशक्ती युवती संमेलन’ युवतींसाठी प्रेरणादायी ठरले. युवतींमधील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास व नेतृत्वक्षमता विकसित व्हावी आणि विकसित भारताच्या उभारणीत त्यांनी सक्षमपणे योगदान द्यावे, या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने या जिल्हास्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!