खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत युतीचाच विजय निश्चित;शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी ता. ०८:- खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलचाच विजय होईल,या पॅनेलचे भाजपचे युवा नेते महेश सारंग, गुरुनाथ पेडणेकर,बाळासाहेबांची शिवसेनेचे अशोक दळवी, नारायण राणे, विद्याधर परब, अनारोजिन लोबो यांच्या नेतृत्वाखाली होत आहे, त्यामुळे विजय निश्चित आहे असा दावा शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केला.
तरी मतदारांनी सदस्य पाहण्यापेक्षा शेतकऱ्यांचा विकास करणारा पक्ष डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्री.केसरकर आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सावंतवाडी तालुक्यातील दोन तडफदार तरुण नेतृत्व सारंग आणि परब यांच्या रूपाने कार्यरत आहेत. त्यामुळे होऊ घातलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत या नेतृत्वांचा फायदा आम्हाला होणार आहे. ही निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र येऊन लढवत आहेत. सत्तेत असल्यामुळे सहकार क्षेत्रात हे दोन्ही पक्ष येथील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे मतदारांनी सदस्य न पाहता कोणता पक्ष शेतकरी हिताचे निर्णय घेऊ शकतो, याचा अभ्यास करून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच भरभरून निधी दिला आहे. कोट्यावधीचा निधी त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. तो सर्वच्या सर्व निधी या ठिकाणी खर्च झाल्यास जिल्ह्यासाठी ही मोठी अचीवमेंट असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत जरी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार विजयी झाल्या असल्या तरी, त्या विजयात मोठे तथ्य नाही. अपक्ष उमेदवार सोडून कोणत्याच पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात उभ्या नव्हता, त्यामुळे त्या विजयात आमचे अपयश आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र उमेदवाराला अपेक्षेपेक्षा कमी मते पडली आहेत. त्याचे खापर भाजपावर न फोडता पक्ष वरिष्ठांनी आत्मचिंतन करावे, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

