रस्सीखेच : उपविजेतेपद रस्सीखेच: मिळूनही डावलले
रस्सीखेच : उपविजेतेपद रस्सीखेच: मिळूनही डावलले
वार्ताहर-:सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य टग ऑफ वॉर रस्सीखेच २३ वी राज्यस्तरीय स्पर्धा १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली होती. सहाशे किलो वजनी गटात अंतिम सामना मुंबई विरुद्ध सिंधुदुर्ग असा झाला. त्यात मुंबईने विजेतेपद पटकावले. मात्र, उपविजेतेपद मिळूनही सिंधुदुर्ग संघाला पारितोषिक न देताच उपविजेतेपद कोल्हापूर संघाला देण्यात आले. या प्रकाराबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी असोसिएशनकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. सावंतवाडीत दाखल झालेल्या खेळाडूंनी भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले. परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे कैफियत सांडली जाईल, असे स्पष्ट केले.
१६ ऑक्टोबरला मुंबई विरुद्ध सिंधुदुर्ग असा सामना झाला. मात्र, काही फरकाने सिंधुदुर्ग संघावर मुंबईने मात करत विजेतेपद पटकावले. बक्षीस वितरण समारंभात उपविजेजेत्या स्थानावर असलेल्या सिंधुदुर्गच्या खेळाडूंना डावलून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरला उपविजेतेपद तर नागपूर संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सिंधुदुर्गातील खेळाडूंनी उपविजेतेपदाचा मान व पारितोषिक का देण्यात आले नाही, अशी विचारणा राज्यअसोसिएशनच्या अध्यक्षांकडे केली. तसेच आयोजक असलेल्या बुलढाणा येथील व्यक्तींनाही विचारले. मात्र, त्यांनी कोणतेही कारण न देता दमदाटी केल्याने उपविजेतेपद मिळूनही रिकामी हाताने परतण्याची वेळ या खेळांडूवर आली..
