आफ्रिकन फिवरच्या डुकरांची विल्हेवाट..प्रशासनात खळबळ..
आफ्रिकन फिवरच्या डुकरांची विल्हेवाट
वार्ताहर कणकवली-: वरवडे येथील एका डुकरांच्या फार्ममधील (पीग फार्म) डुकरांना आफ्रिकन स्वाईन फिवरची लागण झाल्यामुळे फार्ममधील उर्वरित जवळपास २५० डुकरांची रविवारी विल्हेवाट लावण्यात आली. या फार्ममधील जवळपास १०० हून अधिक डुकरांचा मृत्यू आफ्रिकन स्वाईन फिवरमुळे झाला होता. या फिवरची लागण एखाद्या फार्ममधील डुकरांना झाल्यास तेथील डुकरांच्या मृत्यूचा दर १०० टक्के असतो. त्यामुळे या उर्वरित डुकरांची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी फार्मचा संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरणही करण्यात आला.
सदर फार्ममधील काही डुकरांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. अनेक डुकर मृत्यूमुखीही पडत होते. याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून पुणे येथे व तेथून भोपाळ येथील लॅबकडे रक्त नमुने पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल ‘आफ्रिकन स्वाईन फिवर पॉझिटिव्ह निघाला. उर्वरित डुकरांचीही जगण्याची
शक्यता नव्हती. तर त्यांच्या माध्यमातून ‘आफ्रिकन स्वाईन फिवरची भागातील अन्य डुकरांना लागण होण्याचा संभव होता. त्यामुळे या फार्ममधील उर्वरित डुकरांची विल्हेवाट लावणे गरजेचे होते, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. बी. दळवी यांनी सांगितले. डुकरांची अगदी मानवतावादी दृष्टीकोन ठेवून विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर हा संबंध परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. याप्रसंगी डॉ. दळवी यांच्यासह डॉ. देसाई तसेच वरवडे गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थही उपस्थित होते.

