विजेचा लोळ घरात घुसून महिला जखमी
‘विजेचा लोळ घरात घुसून महिला जखमी
प्रतिनिधी-: वैभववाडी.
नानिवडे-वैभववाडी येथील रजनी राजेंद्र तांबे (५०) यांच्या अंगावर वीज पडून त्या जखमी झाल्या आहेत. रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. जखमी महिलेवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी तालुक्यात झालेल्या पावसाने नानिवडे येथील रजनी तांबे यांच्या घरानजीक वीज कोसळली. रजनी या घरात बसल्या होत्या. अचानक विजेचा लोळ त्यांच्या घराच्या दिशेने आला.शिवाय स्फोटासारखा आवाज झाला. या घटनेत रजनी यांच्या पाठीला व हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजांच्या कडकडाटामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

