वागदेत सोशल क्लब च्या नावाखाली जुगाराच्या मैफीली पोलिसांचा छापा
वागदेत सोशल क्लब च्या नावाखाली जुगाराच्या मैफीली पोलिसांचा छापा
अनेकजणांची पळापळ.. पोलीस म्हणतात सगळेच आलबेल
कणकवली :
कणकवलीपासून नजीकच असलेल्या वागदे येथे एका इमारतीत जुगार सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापा टाकला. सदरच्या इमारतीत पत्त्याचे व इतर काही खेळ खेळण्याचा परवाना आहे, असे समजते. तेथे पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने महिला पोलीस अधिकाऱ्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी अनेकजण , वाहने तेथेच सोडून पळून गेले. ही घटना रविवारी रात्री ८.३० वा . च्या सुमारास घडली.
दरम्यान , सदरच्या ठिकाणी जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून आम्ही तेथे भेट दिली. मात्र यावेळी कोणतीही आक्षेपार्ह बाब तेथे आढळून आली नाही, असे पोलिसांतर्फे सांगितले गेले. पण, पोलिसांची चाहुल लागताच अनेकजण पळूनही गेल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात क्लब साठी अधिकृत परवाना कोणाकडेही नाही. धर्मादाय आयुक्त जो परवाना देतात तो वयोवृद्ध लोकांना रमी, बुद्धिबळ, कॅरम असे खेळ खेळण्यासाठी. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात धर्मादाय आयुक्तांच्या परवान्याचा गैर अर्थ लावून क्लब च्या नावावर जुगाराचे अड्डे रात्रंदिवस सुरू आहेत. धर्मादाय आयुक्तांचा क्लब साठी घेतलेला परवाना फोटो फ्रेम करून क्लब मध्ये लावला जातो व जसा काय आपल्याकडे जुगार खेळण्याचाच परवाना असल्यासारखा जुगाराचा अड्डा चालवला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या क्लब मध्ये वयोवृद्ध लोकांपेक्षा तरुणच जास्त पाहायला मिळतात. कॅसिनो मध्ये ज्याप्रकारे पैशांच्या जागी कॉईन्स वापरतात त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्लब मध्ये कॉईन्स घेऊन जुगार खेळला जातो, त्यामुळे सिंधुदुर्गात मिनी कॅसिनो सुरू झाल्याची चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न व डॉ रवींद्र शिसवे यांनी आपल्या कारकिर्दीत सिंधुदुर्गातील अशा रीतीने जुगार खेळणाऱ्या क्लब वर धाडी टाकून क्लब चा पर्दाफाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी घातलेल्या धाडीमुळे धर्मादाय आयुक्तांच्या परवान्याचा अर्थ लोकांना समजला होता.
तसाच छापा टाकण्याचे नाटक काल करण्यात आले व तेथे काहीच नव्हते सर्व आलबेल होते,असे पोलिसांचे म्हणणे आहे, पोलिसांच्या पथकात दोन सहाय्यक निरीक्षक व दोन उपनिरीक्षक असे चार अधिकारीही होते.
याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी, मिळालेल्या माहितीवरून तेथे आम्ही भेट दिली. मात्र, तेथे आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही. त्यामुळे चौकशी करून परत आलो, असे सांगण्यात आले.
सदरच्या ठिकाणी पोलिसांकडून चौकशी वगैरे करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत सोशल क्लब च्या नावाखाली जुगाराचे फड रंगत असल्याची चर्चा आहे व त्याला पोलिसांचे पाठबळ असल्याचे बोलले जाते जर तीथे आक्षेपार्ह काही नव्हतं तर वाहने टाकून काही जण पळून का गेले असा सवाल आता पोलिसांनाच विचारला जात आहे.व छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जाते

