रात्रंदिवस काम करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर दसरा मेळाव्यात काढत होते “झोपा”
केसरकरांच्या गोड बोलण्याला मतदारांनी भुलू नये:तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची टीका
सावंतवाडी, दि.०६:- महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर हे रात्रंदिवस काम करत असल्याने ते झोपा काढत असतात,कधी व्यासपीठावर तर कधी विधिमंडळ सभागृहात झोपा काढतात,काल तर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना दसरा मेळाव्यात ते स्टेजवर झोपा काढत होते. ते खूप काम करत असल्याने तसे होत असेल असा मिशकील टोला सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी लगावला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर नेहमी कामात व्यस्त असतात त्यामुळे ते झोपा काढतात,तसेच दीपक केसरकर यांच्या झोपेमुळे मात्र मतदारसंघातली वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न मात्र गाढ झोपेतल्या स्वप्नातच राहणार नाहीत ना? तीन वेळा लोकांना खोटी आश्वासन देऊन आमदार होण्यासाठी मत मागणाऱ्या व आमदार झाल्यानंतर मंत्री पदासाठी पक्षाशी गद्दारी करत पक्ष बदलणाऱ्या दीपक केसरकर यांच्यामुळे गेली तेरा वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सुटणारच नाही नाहीत असं ह्यांच्या झोपण्यातून जनतेने समजून जायचं का? अशी टीका रुपेश राऊळ यांनी केली आहे.

