सावंतवाडी तालुका झोळंबे गावचे सुपुत्र तथा नवोदित युवा दशावतारी कलाकार अजिंक्य शिवाजी गवस यांना आर्ट बिट्स फाउंडेशन महाराष्ट्र “युवा कला गौरव” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
झोळंबे गावचे सुपुत्र तथा नवोदित युवा दशावतारी कलाकार अजिंक्य शिवाजी गवस यांच्या दशावतार कलेतील अल्पावधीतील योगदानाची पुण्यातील आर्ट बिटस् फौंडेशनने दखल घेतली असून त्यांना आर्ट बिटस् महाराष्ट्र ”युवा कला गौरव” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.
युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोककला या कला विभागातील हा राज्यस्तरीय पुरस्कार असुन ऑनलाईन पध्दतीने हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने अजिंक्य गवस यांच्या लोककलेतील योगदानाची दखल घेत त्यांना राज्यस्तरिय आदर्श युवा युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार प्रदान केला होता.
या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की, एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यासाठी १५ मे ते ३१ जुलै दरम्यान महाराष्ट्रातून अनेक कलाकार आपली माहिती पाठवतात. त्यातून ही निवड करण्यात येते.
आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला आशा सर्वच कला विभागातील कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने काम करीत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांसाठी महाराष्ट्रातील एक सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध दिला आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते. अजिंक्य याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

