आपुलकीच्या नात्याने पाठीवर मारलेली थाप पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ठरेल -सावळाराम अणावकर
आपुलकीच्या नात्याने पाठीवर मारलेली थाप पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ठरेल -सावळाराम अणावकर
मालवण दि प्रतिनिधी
केवळ पैशाने माणूस जगू शकत नाही, मात्र प्रेमाने माणूस दीर्घकाळ जीवन जगू शकतो म्हणून देवळी समाज बांधवांनी आपापसात प्रेम भावना वृद्धिंगत करून आपल्यातील सृजनशीलतेचा ओलावा अधिक घट्ट करावा. आज ज्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला आहे, त्यांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप मारण्यात आली आहे, ती थाप देवळी समाज बांधवांनी आपुलकीच्या नात्याने मारलेली आहे. ही थाप पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी मालवण येथे बोलताना केले.
मालवण वायरी तारकर्ली येथील हॉटेल लौकिकच्या सभागृहात मालवण तालुका देवळी समाज उन्नती मंडळाच्या वतीने विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. अणावकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, सुधाकर पाटकर, रमेश चौकेकर, सुदेश मालवणकर, उमेश श्रावणकर, शेखर केळबाईकर, दादा परुळेकर, महेश धामापूरकर, अनिल तोंडवळकर, बाबल नांदोसकर, संतोष देऊलकर, दीपक किर्लोस्कर, विपुल माळगावकर, बबन तळवडेकर, हनुमंत पाटकर आदी व इतर उपस्थित होते.
प्रारंभी श्रीकृष्ण तळवडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना श्री. सावळाराम अणावकर म्हणाले, मनाचा निग्रह करून जर ध्येय पूर्ततेसाठी जिद्दीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यशाचे शिखर गाठणे कठीण नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी याचा साकल्याने विचार करून आपला मार्ग चोखाळावा, असे सांगतानाच जात ही प्रगतीचा भाग आहे, जोपर्यंत आजची समाजव्यवस्था बदलत नाही तोपर्यंत जात ही जाणार नाही. प्रत्येक गावात देवळी समाज बांधवांची एक दोन घरे असली तरी देवळी समाज बांधवांनी आपल्या मर्यादेच्या विचार न करता सांघिक भावना जोपासून विचार केला तर देवळी समाजाची प्रगती कोणी रोखू शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्यातील समाजबद्दलची निष्ठा जागवली पाहिजे. कर्तव्याचा बोजा उचलला पाहिजे. आणि मी देवळी जातीचा आहे याचा अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी देवळी समाज बांधवानी समाजाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजपा ओबीसी महिला तालुकाध्यक्षपदी निवड झालेल्या सौ. पूजा वेरलकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मालवण तालुक्यातील देवळी ज्ञाती बांधवातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, दहावी बारावी, पदवी, उच्चशिक्षित पदवी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऍड. उर्मिला आचरेकर यांनी केले.

