माती नको, तर खडी टाकून ते खड्डे बुजवावेत-राजा शिवाजी चौक मित्र मित्रमंडळाची मागणी
सावंतवाडी येथील राजा शिवाजी चौक मित्र मित्रमंडळाच्या मागणी नंतर जुन्या बस स्थानक परिसरात सुरू करण्यात आलेले खड्डे बुजविण्याचे निकृष्ट काम आज रोखण्यात आले. बस स्थानक परिसरात आधीच खड्ड्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यात पुन्हा केवळ माती टाकून ते खड्डे बुजविले जात होते. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले. यावेळी माती नको, तर खडी टाकून ते खड्डे बुजवावेत. तसेच स्वच्छता गृहाची अवस्था सुद्धा सुधारावी, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एस. टी महामंडळाचे कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील यांच्याकडे केली.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, विजय पवार, संजय साळगावकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडीतील जुन्या बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याकडे येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाने प्रशासनाचे लक्ष दिले होते. त्यानंतर आज सकाळी माती टाकून ते खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्या कामास विरोध केला. माती टाकून खड्डे बुजविल्यास मुसळधार पावसात त्या ठिकाणी आणखीन चिखल होणार आहे. त्याचा कोणताही फायदा होणार नाही. उलट कामासाठी घातलेले प्रशासनाचे पैसे नाहक वाया जातील. त्यामुळे माती नको, तर खडी टाकून ते खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी करत त्यांनी ते काम रोखले. तसेच येत्या दोन दिवसात संपूर्ण बस स्थानक परिसर स्वच्छ करावा, तसेच स्वच्छतागृहाची सुद्धा झालेली दुरावस्था सुधारावी, अन्यथा आक्रमक पवित्रा हाती घेऊ, असा इशारा दिला आहे