गर्भवती बकरीसह चार पिल्लांना त्या अज्ञात चोरट्याने वगळले मात्र गोठ्यात बांधलेल्या बारा बकऱ्या पळवल्या
तळवडे येथील शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
तळवडे येथील शेतकऱ्याच्या तब्बल बारा बकर्या अज्ञाताने चोरुन नेल्या आहेत. हा प्रकार रविवारी सकाळी पहाटेच्या सुमारास घडला. मात्र संबधिताने एका गर्भवती बकरीसह चार पिल्ले तिथेच ठेवली आहेत. मुकुंद बाबुराव आंगचेकर असे त्या शेतकऱ्यांचे नाव आहे. दरम्यान त्या चोरट्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंगचेकर यांची तळवडे येथे शेती आहे. त्याठिकाणी त्यांनी बकरीपालन केले होते. मात्र रात्री गोठ्यावर कुणी नसल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या बकर्या पळून नेल्या यात त्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार समजताच त्याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली.दरम्यान या चोरीबाबत पंचक्रोशीत विविध तर्क वितर्क लावले जात असून वेगवेगळे अंदाज वर्तवला जात आहेत.

