कोकणसिंधुदुर्ग

आजरा तालुक्यातील काजू शेतकर्‍यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञांच्या भेटी व मार्गदर्शन

 

 

 

🎴 आजरा:२६मार्च:-महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. विजयकुमार देसाई (कीटकशास्त्राचे शास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक), श्री. प्रमोद तल्हा (वरिष्ठ संशोधन सहाय्यक) व डॉ. गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी) यांनी महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कृषि विभागाचे श्री. के. एम. मोमीन (आजरा तालुका कृषि अधिकारी), श्री. निलकुमार ऐतवडे (मंडळ कृषि अधिकारी), कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे समवेत आजरा तालुक्यातील काजू या पिकावरील किड व रोग यासंदर्भात शेतकरी व कृषि विभागाच्या अधिकारी वर्गाच्या असणार्‍या समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेतकर्‍यांच्या काजू बागांमध्ये भेटी दिल्या. आजरा तालुक्यातील वेळवट्टी या गावातील श्री. एस. टी. गुरव (कृषि पर्यवेक्षक) व श्री. पी. डी. गुरव (कृषि सहाय्यक) हे सर्व कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात उपस्थित होते. सदर गावांमध्ये हॉर्टसॅप योजनेअंतर्गत काजूच्या निवडलेल्या बागांना भेटी दरम्यान एकूण १५ काजू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

निवडलेल्या गावातील काजूच्या बागांच्या पाहणीदरम्यान बर्‍याच बागा या मोहोरलेल्या तसेच फलधारणा अवस्थेत व काजू बिया तयार झालेल्या अवस्थेत दिसून आल्या. शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या मोहोर करपण्यासंबंधी समस्येवर उपस्थित शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले गेले. सदर मोहोर करपण्याचे मुख्य कारण हे या भागातील वातावरण असल्याचे दिसून आले. या भागातील वातावरणामध्ये धुक्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ज्यावेळी मोहोर अवस्थेतील फूल परागीभवनाकरीता उमलले जाते त्यावेळी जर त्यावर धुक्यामुळे निर्माण होणारे दवबिंदू फुलांवर व दाट फुलांच्या दांड्यांवर पडल्यास परागीभवन न होता फुले कोमेजून जातात व त्यावर बुरशीचे प्रमाण दिसून येते. तसेच या वातावरणात रसशोषक किडींचे टी मॉस्किटो बग (ढेकण्या) व फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून आला. या सर्वेक्षण व मार्गदर्शन मोहिमेत काजू बागांची पाहणी करून शास्त्रज्ञांनी कृषि विभागाच्या अधिकारी वर्गाच्या किड व रोग सर्वेक्षण व मार्गदर्शनादरम्यान येणार्‍या अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच किड व रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी सविस्तर मार्गदर्शन करून शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे निरसन केले. या भेटीदरम्यान कृषि विभागाच्या अधिकारी वर्ग व शेतकर्‍यांना काजू पीक संरक्षणासाठी लघु मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सदर मोहीम ही प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला सहयोगी संशोधक संचालक डॉ. बलवंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!