श्नावण सोमवार विशेष;पाट येथील जागृत स्वयंभू “श्रीदेव सकलेश्वर” मंदीर
श्रावण सोमवार विशेष
पाट येथील जागृत स्वयंभू “श्रीदेव सकलेश्वर” मंदीर माहिती
समीर चव्हाण
कुडाळ तालुक्यातील पाट गावात देऊळवाडी येथे स्वयंभू श्री देव सकलेश्वरचे मंदीर आहे. मंदिराचे बांधकाम दगडी खांब, लाकडी छप्पर, कौलारु छोटी घुमटी, शिवलिंग, नंदी सभामंडप अशा स्वरूपात आहे. या मंदिराचे जीर्णोद्धार श्री अरविंद लक्ष्मण पाटील यांनी त्यांची आई कै. सौ. अन्नपूर्णा ल. पाटील यांच्या इच्छेनुसार आजोबा कै. श्री नरहर लक्ष्मण ठाकुर व आजी कै. श्रीमती यशोदाबाई न. ठाकूर यांचे स्मरणार्थ व गावातील लोकांच्या सहकार्याने १९ फेब्रुवारी १९९३ रोजी बांधून पूर्ण केले आहे. त्यापूर्वी ह्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली होती. जवळपास हे मंदीर जमीनदोस्त स्वरुपात होते पण सकलेश्वराच्या कृपाशीर्वादाने हे मंदीर पुन्हा उभे करण्याची ताकत व बुध्दी आपल्या भक्तांना दिली. इथले स्थानिक रहिवाशी सांगतात हे मंदीर म्हणजे शून्यातून विश्व निर्माण होण्यासारखे आहे.
आता पाट हायस्कूल येथे असलेले श्री देव रवळनाथाचे प्रसिद्ध मंदीर सुध्दा पूर्वी या सकलेश्वर मंदिराच्या शेजारी होते कालांतराने देवाच्या इच्छेनुसार श्री देव रवळनाथ मंदीर आता आहे त्या ठिकाणी बांधण्यात आले.
येथील वातावरण अतिशय शांत, भक्तिमय आहे. या वातावरणात कोणाचेही ध्यान लागल्याशिवाय राहणार नाही. ‘श्रीदेव सकलेश्वर कला क्रीडा मंडळ देऊळवाडी पाट’ च्या वतीने या मंदिरात वर्षभर विविध सन सांस्कृतिक सोहळे साजरे केले जातात. करंदिकर भटजी नित्यनेमाने या मंदिरात पूजाअर्चा करतात.
महाशिवरात्री निमित्त या मंदिरात तीन दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, दशावतार नाटक, आकर्षक विद्युत रोषणाई असे या उत्सवाचे स्वरूप असते. पूर्वी या ठिकाणी सात दिवसांचा सप्ता हा कार्यक्रम सुध्दा साजरा ह्यायचा. कोजागिरीचा सन सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. श्रावण सोमवार निमित्त या मंदिरात पूजाअर्चा व सायंकाळी भजन केले जाते. श्रावण सोमवारची दिवसभर मंदिरात भाविक भक्तांची ये-जा सुरू असते.
असे हे पाट हायस्कूलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जागृत स्वयंभू श्री देव सकलेश्वराच्या दर्शनाला अवस्य या व आपल्या मनोकामना श्री देव सकलेश्वराच्या कृपेने परीपूर्ण करून घ्या.

