सावंतवाडीत उद्या प्रतिनिधित्व बचाओ..लोकतंत्र बचाओ आंदोलन
*💫सावंतवाडी-:* राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शाखेच्या वतीने सोमवार १२ जुलै रोजी प्रतिनिधित्व ( आरक्षण) बचावो – लोकतंत्र बचावो या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत तालुकास्तरीय धरणे प्रदर्शन व घंटानाद आंदोलन तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. हे आंदोलन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघ सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडीचे संयोजक सगुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असून, याबाबतची माहिती बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी दिली आहे.
आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी २३ जुन पासून २३ जुलै या कालावधीत हे आंदोलन पुकारले असून, चार टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा पार पडला असून, दुसऱ्या टप्प्यात उद्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात तालुकास्तरीय रॅली आणि बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. तर चौथ्या टप्प्यात आरक्षण दिन – जिल्हा स्तरीय रॅली व आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. बहुजन समाजाचे हक्क अधिकार विरोधात सरकार घेत असलेल्या निर्णयाविरुद्ध हे आंदोलन पुकारण्यात आले असून, या आंदोलनाला सर्व बहुजन समाजानी पाठिंबा द्यावा असे आवाहन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडीचे संयोजक सगुण जाधव यांनी केले आहे.