सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांचे उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी – राहुल गायकवाड
🎴सावंतवाडी : दि.२३ वनपाल माणगाव यांनी खोटे व बनावट कागदपत्रे आणि बनावट सह्या करून लाकुड वाहतूक बदली पास दिला. या प्रकरणी वनपालावर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे माहीती अधिकारी जयंत बरेगार यांनी उपवनसंरक्षक शहाजी नरनावर यांना दिली. त्यामुळे कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला आहे, असे आश्वासन तकलादू आहे असे ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर माणगाव वनपाल यांच्या विरोधात कारवाई करावी म्हणून उपोषणास बसले आहेत. त्यांच्याशी उपवनसंरक्षक शहाजी नरनावर यांनी चर्चा केली. यावेळी सहायक वनसंरक्षक आय डी जलगावकर,फिरते वनक्षेत्रपाल श्री. सोनवडेकर उपस्थित होते.
यावेळी उपवनसंरक्षक शहाजी नरनावर म्हणाले, वनविभागात बदली पास व मुदतवाढ देण्याचा निर्णयाला आपण तूर्तास स्थगितीच दिली आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी हा कटू निर्णय घेतला आहे. बदली पास हवा असल्यास कडक नियम घातले आहेत.
सावंतवाडीत सुरू असलेले जयंत बरेगार यांनी संबंधित वनपालावर कारवाई व्हावी,या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. मात्र ते अधिकार आपल्याला नाही. त्यामुळे ते प्रकरण आपण वरिष्ठांकडे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. नारनवर यांच्याशी आज चर्चा केली असता ते म्हणाले, माणगाव वनक्षेत्रात जो बदली पास प्रकार झालेला आहे. त्यात अनेक गुंतागुंतीचे प्रकार आहेत. तक्रार करणारी व्यक्ती आणि सही करणारी व्यक्ती यात समन्वय नाही. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार आहे. यासंदर्भात कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्याचा तपास पोलिस अधिकाऱ्यांनी करायचा आहे. त्यानुसार त्यांचे मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.
श्री. बरेगार यांनी त्या वनपालावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी आज त्यांनी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. परंतु वनपालाला निलंबित करण्यासंदर्भात किंवा कारवाई करण्यासंदर्भात आपल्याला अधिकार नाही त्यामुळे त्यांचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे.
आपण या ठिकाणी आल्यानंतर बदली पासा संदर्भात प्रकार लक्षात आला त्यामुळे आपण बदली पास देणे, मुदतवाढ देणे आदी गोष्टी थांबवले आहेत. तसेच जर कोणाला गरज असल्यास तर त्यांनी वन वनक्षेत्रपाल कडे अर्ज करावा, त्यानंतर वनक्षेत्रपाल यांनी घटनास्थळी जाऊन गाडीची पाहणी करावी, फोटो काढावेत आणि त्यानंतरच खातरजमा करून पास द्यावा, अशी अट घालण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
उपोषण करते जयंत बरेगार म्हणाले, हे प्रकरण दोन-तीन वर्षापूर्वीचे आहे उपवनसंरक्षक यांच्या लक्षात येऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्यामुळे कारवाई होईपर्यंत माझे बेमुदत उपोषण सुरू राहणार आहे.

