संपादकीयसामाजिक

अल्पवयीन मुले दोन नंबर धंद्यात ओढली जातात ती झटपट श्रीमंत होण्यासाठीच..

शासकीय यंत्रणा मोठे हप्ते ठरवून होतात गब्बर-सिंधुदुर्गात सुटकेस घेऊन आलेला अधिकारी जाताना ट्रक घेऊन जातोय..

भविष्यात सर्वपक्षीय उठाव न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल..

म्हातारी मेल्याचे दुःख नाही तर काळ सोकावतोय..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी, दि.०९: अनैतिक धंद्याच्या रॅकेट मधून एका ४६ वर्षीय महिलेचा गळा दाबून खून केला जातो व तो खून पचविण्यासाठी त्या महिलेचा मृतदेह आंबोली दरीत फेकला जातो आणि हे कृत्य करणारे युवक १७ ते २१ च्या वयोगटातील मुले. ही कहाणी मन सुन्न करून टाकणारी ज्या वयात मुलांनी शिक्षण घेऊन भविष्याचा वेध घेतला पाहिजे त्याच वयात ही मुले अनैतिक धंद्याकडे ओढली जात आहेत. शाळा कॉलेजमधील १७ वर्षीय १६ वर्षीय मुले या दोन नंबर धंद्यामध्ये झटपट पैसा कमवण्याच्या आशेने ओढली जातात व प्रत्येक दारूच्या ट्रीपला दोन हजार रुपये दर ठरवला जातो. एखादी गाडी चुकून पकडली गेली तर गाडीचे सारथ्य करीत असलेला संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला सोडून दिले जाते आणि हीच मुले एकदा चटक लागली की, पैसा कमावून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आपले आयुष्य पणाला लावतात. कोलगाव येथील घडलेला हा प्रकार हा त्याचाच परिपाक आहे.

आज सावंतवाडीत नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन नंबर धंदा करत असलेली सर्व मंडळी अशा मुलांचा वापर करतात. आम्ही मागच्या वेळी संपादकीय लेखात नापिक शेमन ज्या पद्धतीने दोन नंबर धंदा करतोय त्याचा पोल खोल केला होता. त्याच्यावर कोणती कारवाई होते, त्याचा तपास कुठपर्यंत आला आहे, याची माहिती आम्ही गोळा करत आहोत. मात्र, हे सर्व करत असताना अशा प्रकारे तरुण पिढी बरबाद होत असेल, तर त्यांना मार्गावर आणणे गरजेचे आहे. महिन्याकाठी लाखो रुपये हप्ता घेणारे संबंधित खात्याचे अधिकारी या दोन नंबर धंदे वाल्यांचे देव असतात. पगाराच्या पन्नास टक्के हप्ता गोळा होतो. महसूल, पोलीस प्रशासन, आरटीओ विभाग, आरोग्य प्रशासन, यांच्या हप्त्याची आकडेवारी बघितली तर डोळे चक्रावतील.

गुटखा बंदी असताना राजरोसपणे गुटखा विकला जातो. दिवसाला लाखो रुपयांचा गुटखा विक्री होत आहे. व संबंधित अधिकारी मात्र, आपला मोठा हप्ता ठरून चिडीचूप आहेत. मुले व्यसनाधीन होत असताना पालकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. आपला मुलगा घराबाहेर पडला तो वेळेत घरी येतो की नाही, तो कुठे गेला होता? त्यांनी एवढा महागडा मोबाईल कसा आणला? तो रोज नवनवीन कपडे कुठून आणतोस? याची चौकशी करणे पालकांचे कर्तव्य असते. मात्र, पालक आपला मुलगा फार हुशार आहे. मोठ-मोठ्या ओळखी आहेत. असा डांगोरा पेटून आपली फसवणूक करून घेत असतात. व आपली मुले अशा एखाद्या प्रकरणात अडकली की, माझा मुलगा त्या गावचाच नाही, अशी ओरडही करतात. मात्र, त्यावेळी त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा जमा झालेला असतो, म्हणून पालकांनीही वेळीच जागे होणे गरजेचे आहे.

दारू धंदा म्हणजे गोवा जवळ असल्यामुळे सिंधुदुर्गात एक नंबरचा धंदा मानला जातो. गोव्यातून चोरटी दारू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते . दारू विकणारे गब्बर तर पिणारे कुटुंब उध्वस्त’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्यातून अल्पशा किमतीत मिळणारी दारू सिंधुदुर्गात चढ्या दराने विकून दारू वाहतूक करणारे गब्बर झाले आहेत. व चोरटी दारू वाहतूक करण्यासाठी जी अल्पवयीन मुले वापरली जातात, त्यांना एका ट्रीप मागे दोन हजार, एक हजार रुपये मिळत असल्याने अशी मुले मोठ्या प्रमाणात या धंद्याकडे आकर्षिली जात आहेत. त्याचाच परिपाक कोलगाव मधील महिलेचा मृत्यू आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना तिला गांजा, दारू पाजली गेली, अति मद्य प्राशन झाल्यामुळे त्या महिलेबरोबर शय्यासोबत करताना तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आता काय करायचे या विचाराने त्या सर्वजणांनी तिला नेऊन आंबोली जंगलात फेकून दिले. हा सर्व पैशाचा माज, झटपट पैसा कमावण्याचा नाद.. आणि आणि कुटुंब नव्हे तर सर्वस्व उध्वस्त. येथे म्हातारी मेल्याचे दुःख नाही. काळ सोकावतोय, नवी पिढी बरबाद होते, आणि आपण फक्त डोळे उघडे ठेवून पाहत राहतो, आता आपण काही करू शकत नाही. कारण संपूर्ण यंत्रणा पोखरलेली आहे. मुळातच कीड लागलेली आहे, तर औषध कुठे घालायचे हा प्रश्न निर्माण होतो. आज सत्तेतले पक्ष या दोन नंबर धंद्या विरुध्द पोलीस प्रमुखांची भेट घेऊन कारवाईची मागणी करतात. ज्यांचा गृहमंत्री आहे. त्यांना अशा प्रकारची भेट देऊन मागणी करावी लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

आमचे असे म्हणणे आहे, अशा धंदा विरोधात सर्व पक्षांनी एकत्र होऊन या विरुद्ध आवाज उठवायला हवा. मात्र, ‘माझे भागले की ते प्रकरण संपले’ ही वृत्ती बंद व्हायला हवी. ज्या वेळी अशी वृत्ती बंद होईल त्यावेळी या दोन नंबर धंदे वाल्यांचा बिमोड झाल्याशिवाय राहणार नाही.  गोवा दारू सिंधुदुर्गात आणली जाते जी दारू गोव्यातच डुप्लिकेट आहे. गोव्यामध्ये अशी बनावट दारू बनवण्याचे अनेक कारखाने आहेत. त्याच कारखान्यातून ही दारू सिंधुदुर्गात आणली जाते. व हि दारू प्यायल्याने अनेक जण आपल्या जिवाला मुकले आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, बायका मुले पोरकी झाली आहेत. मात्र, याचा विचार राजकीय पक्ष करताना दिसून येत नाही. हे सर्व थांबवायचे असेल तर अनैतिक धंद्या विरुद्ध सामूहिक उठाव होणे गरजेचे आहे. नाहीतर युवा पिढीसाठी भविष्य भयावह आहे. पालकांनी आतातरी जागृत होणे गरजेचे आहे. आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे ही प्रत्येक पालकाचे जबाबदारी आहे. नाहीतर भविष्यात कोलगाव सारखी अनेक प्रकरणे घडू शकतात. म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय याचेच दुःख आहे.

*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*

🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!