आरोग्य

दोडामार्गातील पहिल्या ग्रामविलगीकरण कक्षाचा शुभारंभ

 

देशभरामध्ये पसरलेल्या कोविड – १९  महामारीला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीही सक्रिय बनल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत.त्याचबरोबर लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जावू नये,यासाठी आणि सामाजिक अंतराच्या निकषांचे काटेकोर पालन केले जावे,याची दक्षता घेतली जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत गावपातळीवर कोरोना रुग्णांवर उपचाराची कोणतीच सोय नव्हती. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच रुग्णांचे मृत्यूदेखील मोठ्या प्रमाणावर झाले होते. कोरोनासदृश्य कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना कुटुंबीयांपासून अलग ठेवून  त्याच्यावर उपचार करण्यासाठी तालुक्याच्या मुख्यालयी अथवा महसुली गावात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले हाेते,तर काही गावांमध्ये शाळा,समाजमंदिरात संशयित रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती.मात्र देशपातळीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची व्यक्त होणारी शक्यता लक्षात घेता,संभाव्य रुग्णवाढीचा विचार करून शासनानेच आता ग्रामपंचायत पातळीवरच विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून दोडामार्ग तालुक्यात सर्व उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या खोक्रल ग्रामपंचायतच्यावतीने जिल्हा परीषद शाळा खोक्रल येथे उभारलेल्या दोडामार्ग तालुक्यातील पहील्या अलगीकरण केंद्राचे उद्घाटन आज सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व सोयीनी युक्त असे हे अलगीकरण केंद्र असून यात योगासन,बौध्दीक खेळ,चर्चासत्र,मनोरंजनासाठी टीव्ही संगीत,मनोरंजनात्मक नाटीका,विविध प्रकारची होमिओपॅथीक व आयुर्वेदीक औषधे (आर्सेनिक अल्बम गोळ्यासह ),पिण्यासाठी स्वच्छ पाणी,पल्सऑक्सिमीटर,थर्मल गन,थर्मामीटर अशा विविध सुविधा विलगीकरण कक्षातील व्यक्तींसाठी उपलब्ध असतील.

खोक्रल गावच्या लोकांना या अलगीकरण केंद्रचा वापर करावा लागू नये.कोरोना महामारीत आजपर्यंत खोक्रल गावाने जशी जागरूकता दाखवली ती तशीच कायम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे,अशी अपेक्षा डॉ.दळवी यांनी व्यक्त केली.याशिवाय खोक्रल गावचे प्रथम नागरीक सरपंच देवेंद्र शेटकर व त्याची संपूर्ण टीम गावात राबवत असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.सरपंच देवेंद्र शेटकर व त्यांच्या संपूर्ण टिमची हीच उपक्रमशिलता व गावातील लोकांची जागरूकता खोक्रल गावाला कोरोनामुक्तीकडे घेऊन जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमास भाजप तालुकाअध्यक्ष प्रविण गवस,खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दिपक गवस,खोक्रल उपसरपंच गोपाळ गवस,सदस्य विनायक गवस,अंजू गवस,हेमा गवस,सविता गवस,अजय गवस,विक्रम जाधव,ग्रामसेवक विशाल जाधव,ग्रामपंचायत कर्मचारी अमित गवस,साईनाथ गवस,मुख्याध्यापिका श्रीम.गीतांजली मळीक,आशा सेविका वैष्णवी शेटकर,पोलिस पाटील विलास शेटकर,तलाठी कांचन गवस व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!