◾रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वीजपुरवठ्याच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून महावितरणचे कौतुक..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-२२ :- ‘तौक्ते’ चक्रीवादळाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा तडाखा दिल्याने वीजयंत्रणेचे जबरदस्त नुकसान झाले आहे. त्यात कोरोना संसर्गाची आपत्कालीन परिस्थिती असल्याने मोठे व कोविड रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प, मोबाईल टॉवर, पाणीपुरवठा, घरगुती व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध सुरु केलेल्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी दौऱ्यात कौतुक केले.
मा.मुख्यमंत्री ना.श्री उध्दव ठाकरे यांनी काल ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या रत्नागिरी व सिंधदूर्ग या दोन जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यानंतर रत्नागिरी व सिंधदूर्ग या दोन्ही जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला. ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे राज्यातील रत्नागिरी, सिंधदूर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर, पुणे, रायगड व ठाणे या जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. विशेषत: सिंधदूर्ग जिल्ह्यांतील वीजयंत्रणेच्या दुरूस्तीचे कामे तातडीने व्हावीत यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी विशेष लक्ष देत बारामती, कोल्हापूर व औरंगाबाद येथील मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व साहित्य पाठविण्याचे निर्देश दिले होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सिंधुदूर्ग येथील वीजयंत्रणेच्या दुरूस्तीच्या कामांचे समन्वय साधण्यासाठी मुंबई मुख्यालयातील दोन मुख्य अभियंत्याना पाठविण्यात आले.
कोल्हापूर, पुणे, रायगड व ठाणे या जिल्ह्यांचा ९८ टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार २३९ गावांपैकी १ हजार २१२ तर सिंधदूर्ग जिल्ह्यातील ४३९ गावांपैकी ३४४ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित गावांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे या चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधदूर्ग, कोल्हापूर, पुणे, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील ३०६ कोविड रूग्णालये व लसीकरण केंद्राचा तसेच १४ ऑक्सिजन रीफीलींग प्लांटचा बाधित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

