◾तौत्के चक्रीवादळाचा म्हापण दशक्रोशिला जबरदस्त तडाखा..
◾गेले तीन दिवसांपासून म्हापण दशक्रोशी अंधारात, मोबाईल नेटवर्क सुध्दा गायब..
◾बागायती, घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले, दि-१८ :- सोसाट्याच्या वारा, मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट, मध्येच अवकाशात चमकणारी वीज व खवळलेला समुद्र दिवसभर चाललेल्या तौत्के चक्रीवादळाच्या या रौद्र अवताराने म्हापण दशक्रोषीला अक्षरशः झोडपून काढलं.
खासकरून किनाऱ्यालगतची गावे कालवीबंदर, केळूस, खवणे, निवती, किल्लेनिवती, भोगवे या गावांना या चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. काही ठिकाणी तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने लोकांना स्थलांतर सुध्दा करावं लागलं आहे. समुद्राच पाणी किनाऱ्या लगतच्या वस्त्यांमध्ये, विहिरीमध्ये शिरलं. दशक्रोषी मध्ये सर्वत्र मोठ मोठी जुनाट झाडे वादळाच्या तडाख्याने कोसळून कुठे कोणाच्या घरावर तर कुठे रस्त्यावर पडलेली आहेत. आंबा, काजू, नारळ, पोफळ, यांसारखी झाडे मोठ्या प्रमाणावर तुटून पडल्याने बागाययदरांचे मोठे नुकसान झाले तर घरावर झाडे कोसळल्याने बऱ्याच जणांचे मालमत्तेचेही नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे. विजेचे खांब तर चहामध्ये बिस्कुट तुटून पडते तसे सर्वत्र तुटुन पडलेले आहेत. विजेचे खांब एवढ्या प्रचंड प्रमाणावर तुटून पडलेत की गेले तीन दिवसांपासून म्हापण दशक्रोशी अंधारात आहे व विद्युत पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होईल हे सांगणे पण कठीण आहे. निश्चितच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांना युद्ध पातळीवर काम करावं लागेल. बऱ्याच गावातील मोबाईल नेटवर्क सेवा देखील ठप्प झालेली आहे. म्हापण मधील बीएसएनएल नेटवर्क पूर्णपणे गायब झालेले आहे. लाईट गेली की म्हापण बीएसएनएल टाॅवरची बत्ती गुल होते त्यामुळे जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत नेटवर्क येणार नाही अशी तऱ्हा म्हापण बीएसएनएल नेटवर्कची आहे.
एकंदरीत या चक्रीवादळाची व्याप्ती खूप मोठी आहे. यातून झालेली मालमत्तेची हानी खूप मोठी आहे. या वादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी इथल्या लोकांना बराच वेळ लागणार आहे. आधीच कोरोणामुळे घरात बेरोजगार बसलेल्या सिंधुदुर्गवासियांना आता या वादळाने देखील झोडपून काढले आहे. कोरोणाच्या या कठीण काळात हे वादळ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असं म्हटल तर वावग ठरणार नाही. नैसर्गिक आपत्तीत सुध्दा पाठीचा कणा ताठ ठेवून लढणाऱ्या कोकणी माणसाच्या पाठीशी सरकार यावेळी तरी उभ राहिलं आणि लवकरात लवकर या वादळाचा वणव्यात होरपळून निघालेल्या पिडीतांना सरकारी मदत पोचेल अशी आशा आहे.

