आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

◼️पावसाळ्यापूर्वी नवीन बहादुरशेख पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणार..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि-२६ :- गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेखनाका येथील पुलाचे काम रखडले होते. मात्र या मुलाच्या कामाने वेग घेतला असल्याने येत्या जून महिन्यापर्यंत या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होईल असे सांगितले जात आहे. या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्यास सर्वसामान्य थोडासा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांमधून केली जात होती. याची दखल घेऊन केंद्र शासनाने मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करण कामाला हिरवा कंदील दिला. यानुसार गेल्या तीन-चार वर्षांपासून मुंबई-गोवा मार्गाचे चौपदरीकरण काम सुरू आहे. या चौपदरी करणंअंतर्गत चिपळूण वाशिष्ठी नदीवरील बहादूर शेख नाका येथील पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात या पुलाच्या कामाला जोमाने सुरुवात झाली. मात्र, कालांतराने या पुलाचे काम रखडले. यामुळे या पुलाचे काम पूर्णत्वास कधी जाणार असा प्रश्न सर्वसामान्य मधून उपस्थित केला जात होता तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सभापती शौकत मुकादम यांनी या कलाच्या पूर्णत्वासाठी सातत्याने प्रशासन व ठेकेदार कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या पुलाचे काम करणारी ठेकेदार कंपनी बदलण्यात आली. नंतर पुन्हा एकदा या पुलाच्या कामाला जोमाने सुरुवात झाली. या पुलासाठी ठेकेदार कंपनीने ३२ गर्डर बनवले साधारणता एक गर्डर २२० टन वजनाचा आहे सदरील गर्डर बनवण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी गेला. पूर्णत: गर्डर बनवून झाल्यानंतर ठेकेदार कंपनीने गर्डर उचलून पिलरवर ठेवण्यासाठी नदीत मातीचा भराव टाकला. दरम्यान, हा भराव पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावा, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली होती.

अन्यथा खेर्डी, कळंबस्ते, चिपळूण परिसरात पावसामध्ये पाण्याचा फुगवटा मारून पूर भरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निदर्शनास आणून दिले. याची ठेकेदार कंपनीने तातडीने दखल घेऊन गर्डर उचलण्यासाठी ४०० टनाच्या तीन क्रेन व दोन ट्रॉली मागवून काही दिवसांपासून गर्डर उचलून पिलरवर ठेवण्यात येत आहेत. एकंदरीत या पुलावरून पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गर्डर ठेवण्यासाठी टाकलेला भराव देखील काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. एकंदरीत रखडलेल्या पुलाचे काम उशिरा का होईना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे दुहेरी वाहतूक होण्याच्या दृष्टीने पूलाचे काम कधी पूर्ण होणार? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याच पुलाला जोडून बहादूरशेख ते शिवाजी नगर चिपळूण दरम्यान उड्डाणपूल होणार आहे. या पुलाचे काम आता सुरू झाले असून पुलाचा पहिला खांब उभारण्यासाठी लोखंडी सांगाडा तयार झाला आहे लवकरच या खांबावर काँक्रीट ओतले जाणार आहे. बहादूर शेख नाका ते अतिथी हॉटेल युनायटेड हायस्कूल, शिवाजीनगर दरम्यान हा उड्डाणपूल उभा राहणार आहे. मुंबईहून येणारी वाहने याच मार्गाने पुढे सावर्डे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याच्या दिशेने जाणार आहेत. तर पुलाखालून स्थानिक नागरिकांसाठी सर्विस रोड असणार आहे. त्याचे काम वेगात सुरू आहे. काही मोऱ्यांचे व गटारांचे काम बाकी असल्याने पॅच पॅच करून सर्विस रोड बनवण्यात आला आहे. ती कामे पूर्ण होताच हे सर्व तुकडे जोडून सलग सर्विस रोड आकाराला येईल. दरम्यान, महामार्गाचे काम करणारे काम करणारे काही कामगार कोरोनाबाधित झाल्याने या कामावर कितपत परिणाम होतो? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!