◼️कै.अरविंद (आप्पा) जाधव यांची निरंतन स्मृती म्हणजे अपरांत हाॅस्पिटल..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२५ :- दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्षे कालगतीनुसार पुढे जात असतात. असेच काळाचे भान ठेवून कांही माणसे, माणसे नव्हते महान विभुतीच त्या!
आयुष्यभर कांही विशिष्ट ध्येय डोळयासमोर ठेवून देह नश्वर आहे. कधीतरी जाणारच ही जाणीव घेऊन या विभुती जगतात. शेवटचा श्वास हा जीवन यात्रेची अखेर सांगणारा मैलाचा दगड. इच्छा असो वा नसो जन्मभर चालायचं असतं. पण जग सोडताना नियोजीत उद्दीष्ट पूर्ततेच्या समाधानाने जायचं असत. शेवटी आयुष्य असंच जगायचं असतं ना!!
तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. मी अनेक संस्थांमध्ये पदे भुषविली, शेवटचा टप्पा चि.न.प. चा नगरसेवक. आज माझ्या ८१ व्या वर्षी मी मागे वळून पहातो तेव्हां माझे असंख्य सुहृुद मित्र, नातेवाईक या जीवन पटाच्या रंगभूमीवर विशिष्ट ध्येय पूर्तीनंतर देवाला प्रिय झालीत.
अनेक घनिष्ट तसेच परिचीत संबंधातील व्यक्तीची बातमी ज्यावेळी पेपरला येते तेव्हां दुःखाला पारावार रहात नाही. ती व्यक्ती जशी कुटुंबाचा आधारवड असते तशी ज्या ज्या संस्थांत विद्यमान कार्यरत असते तिथे निर्माण होणारी त्याच्या उणिवेची पोकळी नियतीच्या रचनेनुसार भरून यावी, असे दिसले तरी त्या व्यक्तीची उणीव ही खास वैशिष्ट्य सांगणारी असते. काळ हेच त्यावर औषध असते.
माझे परममित्र वैकुंठवासी अरविंद (आप्पा) जाधव, चिपळूण हे असेच व्यक्तिमत्त्व!! त्यांना 19 एप्रिल 2021 रोजी देवाज्ञा होऊन तीन वर्षे झाली हे वास्तव असले तरी त्यांची आठवण झाली म्हणजे मन विषण्ण होऊन गलबलून येते. माणसे वाचणे (reading) हा आप्पांचा स्वभाव. डोळसपणे सर्वत्र वावरले आणि म्हणून जेष्ठ नागरीक संघ, लो.टी. वाचनालय, चिपळूण अशा अनेक संस्थांत आपल्या ज्ञानाचा, जेष्ठत्त्वाचा लाभ त्यांनी दिला. जिथे उणीव भासते तिथे झोकून देवून करंगळी लाऊन संस्थेला चाकोरीत आणणाऱ्या व्यक्तींत आप्पा वरच्या नंबरला शोभतात.
मला वेळ नाही म्हणणारीच मंडळी आपल्या वेळेचा सदुपयोग करतात. मला आप्पांचा परिचय तसा उशिराच झाला. जशी जवळीक वाढली तेव्हां बौद्धिक दृष्ट्या मी त्यांच्यापेक्षा किती खुजा आहे हे जाणवले. पण अत्तर लावलेल्या माणसाला अंग घासले तर तो सुगंधही आपणाकडे येतो, म्हणून आप्पांशी जवळीक वाढविली तेव्हां समजले आप्पा थोर साहित्यिक आहेत. त्यांनी काव्य, नाटके व कविताही लिहिल्या आहेत. माझ्या ‘‘संत नामदेव’’ पुस्तकाला ति. आप्पांची प्रस्तावना हे मी माझे भाग्य समजतो.
त्यांच्या (पत्नीलाही) वहिनींच्या लहानपणापासून ओळखतो. त्या माझ्या बहिणीची वर्ग मैत्रीण व वहिनींचा भाऊ माझा वर्गमित्र. बालपणी त्या वडनाक्यावर कै. तात्या कोवळे यांच्या घरासमोर काळसेकर यांच्या घरात रहायच्या. नंतर शिक्षिका होत्या. माझी मुलगी डाॅ. प्राजक्ता त्यांची विद्यार्थिनी. म्हणजे कै. आप्पांच्या घरात ज्ञानाची उपासना. अशा सुसंस्कृत वेलीवर डाॅ. यतीन जाधव यांच्यासारखा सुपुत्र जन्माला आला. साल आठवत नाही पण सुरूवातीला खेंड, पिंपळ गणपती येथे जाधव ‘स्प्रिंग’ नावाने चर्मरोग व अन्य O.P.D. सुरू केली त्या ओपनिंग सेरिमनीला मी गेलो होतो. वैद्यकीय क्षेत्रात जी तृटी डाॅ. यतीन यांच्या लक्षात आली त्यात त्यांनी खूप ज्ञानी डाॅक्टरांशी संपर्क करून त्यांना आपल्या हाॅस्पिटलमध्ये जोडले आणि चिंचनाका भोगाळे भागात ‘‘अपरांत हाॅस्पिटल’’ सुरू केले.
रूग्णाला ज्या तपासणीसाठी पुणा, कराड, रत्नागिरी, कोल्हापूर येथे जावे लागायचे, त्या सर्व तपासण्या अपरांत येथे अल्प दरात आधुनिक यंत्र सामुग्रीने होतात. तीन महिन्यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात माझी प्रकृती अचानक बिघडली. घरच्यांची खूप धावपळ झाली पण अपरांत मधील अचूक निदानाने मला पुनर्जन्म मिळाला. ति. कै. आप्पांचे आशीर्वादच अपरांत रूपाने डाॅ. यतीन यांच्या पाठीशी आहेत.
डाॅ. यतीन जाधव यांच्यासारखा तेजोमणी मुलगा आप्पांनी चिपळूणला दिला. अपरांत हाॅस्पिटल हे आप्पांच्या आशिर्वादाचेच सदाबहार फूल. फक्त चिपळूण नव्हे तर जिल्हात व महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील उन्तुंग भरारी घेतलेले हे हाॅस्पिटल जनता जनार्दनाच्या सेवेत परमेश्वर रूपाने अवतरले आहे. अपरांत म्हणजे कै. आप्पांची चिरंतन स्मृती आहे.
चिपळूणात ४/६ मोठी हाॅस्पिटल्स आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव अद्यापही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लसीकरणासाठी शासकीय रूग्णालये प्रयत्नशील आहेतच, पण अपरांत सारख्या अद्ययावत सर्व हाॅस्पिटल्स मध्ये बेड वाढवून त्यांना लसिकरणाची ऑक्सिजन एक्सप्रेस सेवा देता यावी अशी सुविधा प्रषासनाकडून कार्यान्वित व्हावी म्हणजे कोरोनासारखी महामारी आटोक्यात येण्यास मदत येईल.

