परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता ८ दिवस विनाकारण बाहेर फिरु नये-अक्रम खान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढल्याने रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यातून येथे येणाऱ्या चाकरमान्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेत विनाकारण न फिरता आठ दिवस घराबाहेर पडू नये. आपल्या बरोबर इतरांची देखील काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
बांदा शहर व परिसरात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. बांदा दशक्रोशीत गेल्या चार दिवसात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी आपली काळजी घ्यावी. शक्यतो गावात येताना कोरोना टेस्ट करूनच प्रवेश करावा.
गावात किंवा शहरात फिरताना मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता अत्यावश्यक असेलच तरच घराबाहेर पडावे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांनी विनाकारण फिरताना आढळल्यास कोरोना प्रतिबंधक नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे खान यांनी सांगितले.

