◾सराफ व्यावसायिकांवर लॉकडाऊनमुळे नुकसानीचे संकट ; नियमांच्या आधीन राहून परवानगी द्यावी ; चिपळूण तालुका सुवर्णकार संघाची मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-११ :- सराफ व्यावसायिकांना साधारणतः जानेवारी ते मे हा कालावधी उत्सव आणि लग्नसराईचा असल्याने व्यवसायाची बऱ्यापैकी उलाढाल होते.मात्र मागील वर्षी लॉकडाऊन मध्ये गेल्याने आधीच अडचणीत असणारा सराफ व्यावसायिक आताच्या लॉकडाऊन मुळे अधिक नुकसानीत चालला असल्याने नियमांच्या अधीन राहून आमच्या व्यवसायास परवानगी द्यावी अशी मागणी चिपळूण तालुका सुवर्णकार संघाने केली आहे.
पाडव्याच्याच मुहूर्तावर चिपळूण शहरात मोठी उलाढाल होते. अशा मुहूर्तावर होणाऱ्या व्यवसायावर या व्यावसायिकांचा वर्षाचा व्यवहार अवलंबून असतो. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने जारी केलेल्या नियमावलीमुळे हा व्यवसाय बंद असल्याने सराफ व्यवसायिकांसह व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सोन्याच्या वाढत जाणाऱ्या दरामुळे स्टॉक वरील कराची रक्कम देखील वाढत आहे, ती भरणे देखील अडचणीचे होत चालले आहे. कामगार वर्गाला देखील संभाळणे यामुळे जिकरीचे झाले आहे.तरी लॉकडाऊनमधून सवलत द्यावी व सराफ व्यवसायाला आधार द्यावा अशी मागणी सुनील सागवेकर अध्यक्ष चिपळूण तालुका सुवर्णकार संघ व सदस्य यांनी केले आहे.

