शाळा नं. 3 च्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक
🖥️ Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴सिंधुदुर्ग : दि. ०८ जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, स्थानिक आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कणकवली शहरातील भाळचंद्र महाराज मठानजिकच्या शाळा नं. 3 च्या स्थलांतराबाबत संस्थान आणि शाळा व्यवस्थापन समिती, नगरपंचायत यांच्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
शाळा नं. 3 च्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला संस्थानचे अध्यक्ष कामत, नगराध्यक्ष समीर नलावडे, जि. प. मुख्याधिकारी नायर, नगरपंचायत मुख्याधिकारी साबळे, शिक्षणाधिकारी आंबोकर, विरोधी गटनेता सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
भालचंद्र महाराज संस्थान विस्तारीकरण साठी लगतची शाळा नं. 3 ची जागा घेऊन शाळेसाठी पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव संस्थानने ठेवला आहे. याला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत संस्थानच्या आर्किटेक्चरने विस्तारीकरणचा केलेला आराखडा नगरपंचायतमध्ये सादर केला जाईल.
तसेच शाळेला दिली जाणारी पर्यायी जागा याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि भालचंद्र महाराज संस्थान यांच्यात येत्या दोन दिवसांत बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार नितेश राणे व आमदार वैभव नाईक यांनी सर्वानुमते तोडगा काढण्याबाबत एकमत दर्शवले.

