” वेळ निघून जात आहे, क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची! “
◼️क्षयरोग जनजागृतीसाठी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चा पुढाकार !
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : सुनिल आचरेकर
🎴कसाल : दि. २७ आपल्या देशात क्षयरोगाचे प्रमाण कमी करायचे असेल तर वेळीच निदान व उपचार करून घेणं गरजेचं आहे . दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला व ताप ,वजनात घट,थुंकीतून रक्त पडणे अशी लक्षणे असणा-या व्यक्तींनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन थुंकी तपासून घ्यावी,क्षयरोगाचे उपचार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.हर्षल जाधव यांनी केले. क्षयरोग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल, जिल्हा क्षयरोग विभाग आणि कोलते हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोलते हॉस्पिटलच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.हर्षल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदेश कांबळे, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष डॉ प्रशांत कोलते, सदस्य व्हिक्टर फर्नांडिस व अरूण मालणकर उपस्थित होते.
डाॅ.दर्शना कोलते यांनी उपस्थितांचे स्वागत केले व क्षयरोग दिनाची संकल्पना समजावून सांगितली. वेळ निघून जात आहे क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची .सन २०३० पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट जगाने ठेवलेलं आहे. ते गाठायचं असेल तर वेळ घालवून चालणार नाही असे डाॅ.दर्शना कोलते म्हणाल्या.
डाॅ.संदेश कांबळे म्हणाले , वेळीच औषधोपचार केल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो .त्यामुळे घाबरून न जाता लक्षणे असल्यास वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.खाजगी डाॅक्टर्स व शासकीय रूग्णालये यांच्यामध्ये समन्वय असल्यामुळे २०१५ च्या तुलनेत सिंधुदुर्गातील क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण २० % नी कमी झालेले आहे आणि यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाला कांस्य पदक मिळाले आहे. यावेळी सर्वांनी जिल्हा क्षयरोग विभागाचे कौतुक केले.
खाजगी क्षेत्रात टीबी निदान व उपचार याबाबत उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात डाॅ.प्रशांत कोलते यांचा जिल्हा क्षयरोग अधिका-यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यशस्विनी फाऊंडेशन, सावंतवाडी यांनी क्षयरोगावरील लोकांची भीती,गैरसमज दूर होण्यासाठी पथनाट्य सादर केले. याप्रसंगी बोलताना रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष डॉ प्रशांत कोलते म्हणाले, दर तीन मिनिटाला आपल्या देशामध्ये क्षयरोगामुळे मृत्यू होतो जे टाळता येण्याजोगे आहे कारण क्षयरोगाला पूर्ण उपचार आहेत. पण लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला हवी. आपल्या जिल्हा क्षयरोग विभागाची टीम खूप चांगले काम करत आहे .यावर्षी कास्यं पदक मिळाले आहे, पुढील वर्षांत आपल्याला सुवर्ण पदक मिळून आपला जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी जे काही सहकार्य आपल्याकडून व रोटरी क्लब च्या माध्यमातून लागेल ते करण्याचे आश्वासन डाॅ.कोलते यांनी यावेळी दिले.
यावेळी लक्ष्मण कदम, सुरेश मोरजकर, रोहन शारबिद्रे, अनिरुद्ध चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.दर्शना कोलते यांनी केले व आभार प्रदर्शन डाॅ.प्रशांत कोलते यांनी केले.

